Join us

पोस्ट कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ‘बातचीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात टपाल कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. रेड झोन, प्रतिबंधित इमारती, कोविड केंद्रांतही सेवा देत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात टपाल कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. रेड झोन, प्रतिबंधित इमारती, कोविड केंद्रांतही सेवा देत त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा कायम राखली आहे. त्यामुळे या काळात येणारा ताण, भीती, चिंता दूर करून त्यांचा थोडा विरंगुळा व्हावा या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिक्षेत्राने ‘बातचीत’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पोस्ट सेवेच्या संचालक केया अरोरा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांशी नाते अतूट रहावे, त्यांना मानसिक आधार मिळावा, तज्ज्ञांचा सल्ला घेता यावा या उद्देशाने ‘बातचीत’ हे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. टपाल सेवा देताना ग्राहकांचा जास्तीत जास्त संपर्क टाळण्यासाठी काय करावे, कोरोनापासून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा बचाव कसा करावा, ऑक्सिजन पातळी कशी मोजायची इथपासून ते ओंकार कसा लावावा याची माहिती या माध्यमातून दिली जात आहे. पर्यावरणाचे महत्त्व, मुंबईत अलीकडे उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या उद्यानांमागील संकल्पना, शिवाय छंद जोपासण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन मिळत असल्याने या चर्चासत्रामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

प्रत्येक संस्था कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कामाची अपेक्षा करीत असते. पण त्यांचे मनोधैर्य वाढविणे, कामाचे कौतुक करणे किंबहुना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपाययोजना करताना कोणी दिसत नाहीत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अशा उपक्रमाची सर्वाधिक गरज आहे, हे ओळखून ‘बातचीत’चे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र परीक्षेत्राचे प्रमुख पोस्ट मास्तर जनरल ए.सी. अग्रवाल यांनी दिली.

...........

योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

‘बातचीत’ या चर्चासत्रामध्ये आतापर्यंत डॉ. गौतम भन्साळी, आयझॅक किहीमकर, मिलिंद वंजारे, वैभव जागृष्टे, सचिन पुणेकर, अदिती चौधरी, स्मिता अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले आहे. योगदिनानिमित्त २१ जून रोजी सांताक्रुझ येथील योग संस्थेच्या संचालक डॉ. हंसा योगेंद्र ऑनलाईन संवाद साधणार आहेत.