कांदिवलीच्या संस्कृती कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसचे केले क्वारंटाईन सेंटर मध्ये रूपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 07:58 PM2020-07-05T19:58:56+5:302020-07-05T19:59:53+5:30
गृहनिर्माण सोसायटी मधील रिकामे फ्लॅट्स, जिमन्याशीयम, क्लब हाऊसचे रूपांतर कोविड केअर सेंटर मध्ये केले जात आहेत.
मुंबई : उत्तर मुंबईत ज्या वेगाने कोरोना रुग्णात वाढ होत आहे, त्याच वेगाने कोविड -19 केअर सेंटरची सुरुवात होत आहे.हॉस्पिटल मधील बेडची उपलब्धतेची समस्या आणि संशयित रुग्णांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी जागेची टंचाई लक्षात घेता उत्तर मुंबईत अनेक गृह निर्माण संस्था स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांची संकल्पना उचलून धरत आहे. येथील गृहनिर्माण सोसायटी मधील रिकामे फ्लॅट्स, जिमन्याशीयम, क्लब हाऊसचे रूपांतर कोविड केअर सेंटर मध्ये केले जात आहेत.
कांदिवली ( पूर्व) ठाकूर कॉम्प्लेक्स येथील संस्कृती कॉम्प्लेक्स रेसिडंटस असोसिएशन - फेज 1च्या पदाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोना महामारीच्या जागतिक संकटकाळात सधन सोसायटीमध्ये क्वारंटाईन सेंटर उभे करण्याचे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले होते.याची पूर्तता करत सोसायटीच्या सुमारे 350 फ्लॅट धारकांसाठी संस्थेचे क्लब हाऊसचे रूपांतर करून आयसोलेशन सेंटर उभे केले. पाच बेड उपलब्ध असलेल्या या क्वारंटाईन सेंटर मध्ये पल्स ऑक्सिमीटर, आय आर डिजिटल थर्मोमीटर, बी पी मॉनिटर, एन 95 मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर, पीपीई किट्स, अत्यावश्यक ऑक्सिजन, स्वच्छता गृह सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आज गुरु पूर्णिमेच्या शुभ मुहूर्तांवर या क्वारंटाईन सेंटरचे उदघाटन खासदार शेट्टी यांनी केले.या प्रसंगी स्थानिक नगरसेविका आसावरी पाटील आणि भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना उपस्थित होते. या सेंटरच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोसायटी च्या मॅनेजिंग कमिटीच्या येथील सदस्यांची एक टीम तयार केली आहे.या सोसायटीतील स्थानिक डॉक्टर्स व परिचारिका आपला अमूल्य वेळ देऊन या क्वारंटाईन सेंटर साठी काम करणार आहेत. या प्रसंगी संस्कृती कॉम्प्लेक्स फेज 1 चे मॅनेजिंग कमिटीचे दिलीप पोकळे, नवीनचंद्र पालव, डॉ चिरंजित जैसवाल, डॉ नितीन शाह, बी एन प्रसाद, भैरव देसाई, दीपक शेट्टी, प्रकाश गावडे, गिरीश कोपर, संदीप दुबे व इतर मान्यवर उपस्थित होते.