प्रेमासाठी धर्मांतर; दीड वर्षातच घटस्फोटाची नामुष्की; पत्नीनेच सांगितले, 'मला नांदावयाचे नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 11:56 AM2023-06-21T11:56:58+5:302023-06-21T11:57:20+5:30
वर्षाला (बदलेले नाव) माहेरच्या लोकांनी जबरदस्तीने राजस्थानला घेऊन गेल्याने साहिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मुंबई : प्रेयसीबरोबर विवाह करता यावा म्हणून धर्मांतर करणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर घटस्फोटाची नामुष्की ओढावली आहे. विवाह करून माहेरी गेलेल्या मुलीने पुन्हा साहिलबरोबर नांदण्यास तयार नसल्याचे उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले. त्यावर न्यायालयाने मुलगी सज्ञान असल्याने तिचा निर्णय घेऊ शकते, असे म्हणत तिला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घटस्फोट घेण्याची सूचना केली.
वर्षाला (बदलेले नाव) माहेरच्या लोकांनी जबरदस्तीने राजस्थानला घेऊन गेल्याने साहिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्षाला न्यायालयात हजर करण्यात यावे व तिचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी पतीने हेबियस कॉर्पस (व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी याचिका) दाखल केली. गेल्या सुनावणीत न्या. रेवती मोहिते- डेरे व शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मीरा रोड पोलिस ठाण्याला वर्षाला २० जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार, पोलिसांनी वर्षाला न्यायालयात हजर केले. तिच्यासह तिचे पालकही न्यायालयात हजर होते. हे प्रकरण संवेदनशील असल्याने न्यायालयाने इन-कॅमेरा सुनावणी घेतली.साहिलच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाने हा विवाह स्वत:च्या मर्जीने केल्याचे न्यायालयात मान्य केले. मात्र, आता आपले मतपरिवर्तन झाले असून घटस्फोट हवा असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तिला कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच घटस्फोट मिळेल, असे सांगितल्याचे साहिलच्या वकिलांनी सांगितले.
साहिल चौधरी (२२) याने दाखल केलेल्या याचिकेनुसार, धर्मांतर करण्यापूर्वी साहिलचे नाव फैज अन्सारी होते. फैज व वर्षा यांची भेट ते शिकत असताना २०१७ मध्ये झाली. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वर्षाच्या पालकांचा विवाहाला विरोध असल्याने फैजने हिंदू धर्म स्वीकारला.
२६ फेब्रुवारी २०२२ रोजी दोघांनी वांद्रे येथील विश्वेश्वर मंदिरात विवाह केला. ८ जुलै २०२२ रोजी त्यांच्या विवाहाची नोंदणी झाली. मात्र, विवाहानंतरही दोघे विभक्त राहिले. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्षाने पालकांचे घर सोडले आणि साहिलच्या घरी आली. घर सोडण्यापूर्वी तिने चिट्ठी लिहून ठेवली होती, असे याचिकेत म्हटले आहे.
वर्षा साहिलच्या घरी असतानाही तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही बोलावले. तिने आपण हरवले नसून आपल्या पतीच्या घरी राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांनी तिला चार दिवस माहेरी पाठविण्यास भाग पाडले.