अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; नव्या ६५ महाविद्यालयांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:34 AM2019-05-18T02:34:02+5:302019-05-18T02:34:14+5:30
नोंदणी झालेल्या ८४९ महाविद्यालयांमध्ये ३५ नवीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांत मराठा आरक्षणावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर दहावीतील विद्यार्थ्यांच्या मनात अकरावी प्रवेशाची धाकधूक होती. मात्र यंदा नवीन ३५ महाविद्यालयांनी प्रवेशांसाठी नोंदणी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
आॅनलाइन अकरावी परीक्षेसाठी मुंबई उपसंचालक विभागाकडून सुरू असलेली नोंदणीप्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून ८४९ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ३५ नवीन महाविद्यालयांचा समावेश असून विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक नवीन महाविद्यालयांची नोंदणी झाली आहे.
नोंदणी झालेल्या ८४९ महाविद्यालयांमध्ये ३५ नवीन महाविद्यालयांचा समावेश आहे. या ३५ महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी १३, विज्ञान शाखेसाठी २७ तर वाणिज्य शाखेसाठी २५ तुकड्यांसाठी नोंदणी करण्यात आल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुंबई उत्तर, मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिणसह ठाणे आणि पनवेल या विभागांमधून नवीन महाविद्यालयांनी नव्याने नोंदणी केली आहे. नोंदणी प्रक्रियेला सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी शेवटच्या पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. दहावीच्या फुगलेल्या निकालांमुळे अकरावीला प्रवेश मिळविण्यासाठीची स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यंदापर्यंत सामाजिक आरक्षणे आणि वेगवेगळ्या कोट्यातील जागा वगळून खुल्या गटासाठी २३ टक्के जागा शिल्लक राहात होत्या. यंदा त्यामध्ये मराठा समाजासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे व्यवस्थापन कोट्यात अतिरिक्त शुल्क भरून प्रवेश घेणे, संस्थांतर्गत कोट्यात प्रवेश घेणे किंवा अल्पसंख्याकांसह एखाद्या संस्थेने त्यांचा संस्थांतर्गत कोटा केंद्रीय प्रवेश फेरीसाठी समर्पित करण्याची आशा बाळगणे एवढेच पर्याय खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत. मात्र आता नवीन महाविद्यालयांच्या नोंदणीमुळे एका तुकडीत ८० विद्यार्थी सामावले जातील. त्यामुळे अकरावी प्रवेशोच्छुक सर्वच विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.