अवैध मद्य उत्पादन व विक्रीचे मंगळवारी १०४ गुन्हे दाखल, ५९ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:39 PM2020-04-15T17:39:33+5:302020-04-15T17:40:14+5:30
मद्यविक्री दुकाने बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अवैध पध्दतीने मद्य निर्मिती व मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात मंगळवारी राज्यभरात विविध ठिकाणी १०४ गुन्हे दाखल करण्यात आले.
मुंबई : कोरोनामुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अवैध पध्दतीने मद्य निर्मिती व मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात
मंगळवारी राज्यभरात विविध ठिकाणी १०४ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये ५९ आरोपींना अटक करण्यात आली. तर १४ वाहने जप्त करण्यात आली असून ५० लाख
८६ हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. २४ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये
राज्यात २ हजार ६९७ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यामध्ये १ हजार १०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर १५७ वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत
६ कोटा ८४ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील अधिकृत मद्यविक्री पू्र्णतः बंद असल्याने मद्यपींना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन वाईन, ऑनलाईन लिकरच्या नावाखाली फसव्या जाहिराती केल्या जात आहेत.
ऑनलाईन पेमेंट करण्यास ग्राहकांना भाग पाडून त्यांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांनी अशा प्रकारच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन उत्पादन शुल्क विभागातर्फे
करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या विविध भागात धाडसत्र सुरू असल्याची माहिती संचालक (दक्षता व अंमलबजावणी ) उषा वर्मा
यांनी दिली. मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आली. अहमदनगर मधील निमगाव कोर्हाळे तालुका राहता
येथे बियर चे 844 बॉक्स व वाईन चे 120 बॉक्स असे एकूण 24 लाख 39 हजार रुपये किमतीचे 964 बॉक्स जप्त करण्यात आल्याची माहिती वर्मा यांनी दिली.