१७ फेब्रुवारीला एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ; १३,७४९ विद्यार्थिनींना पदवी-पदविका
By रेश्मा शिवडेकर | Published: February 14, 2024 03:17 PM2024-02-14T15:17:39+5:302024-02-14T15:18:08+5:30
समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत.
मुंबई - श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) ७३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचे आयोजन १७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल) करण्यात आले आहे.
यावेळी १३,७४९ विद्यार्थिनींना १९३ विषयातील पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील. एकूण ४३ विद्यार्थिनीना पीएचडी पदवी देण्यात येतील. तसेच परीक्षेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या ७१ विद्यार्थिनींना सुवर्ण, रजत पदक, चषक देण्यात येईल. १३३ विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत. ते समारंभाचे अभिभाषण करतील. बक्षीसपात्र व पीएच.डी.धारक विद्यार्थीनींनी दीक्षांत समारंभास व त्याच्या सरावासाठी निर्धारित वेशभूषेत १७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजता विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या www.sndt.ac.in या अधिकृत संकेत स्थळावर पाहता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर यांनी दिली.