२३ जानेवारीपासून मुंबईकडे निघणार वाहनांचा जत्था
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देतानाच चार सदस्यीय समिती नेमली. त्याला संयुक्त किसान मोर्चाने विरोध केला आहे. देशभरात २३ ते २६ जानेवारीदरम्यान आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय विविध संघटनांनी घेतला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. तर, १८ जानेवारील ‘किसान महिला दिवस’ साजरा करणार आहे. महाराष्ट्रात राज्यभरातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात उतरणार आहेत. विविध संघटना दि. २३ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारीला आझाद मैदान येथे सर्व जण एकत्र येतील आणि २५ जानेवारीला दुपारी २ वाजता राज भवनाच्या दिशेने निघतील. तसेच २६ जानेवारीला शेतकरी-कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली असून, या आंदोलनास महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा. तसेच २५ जानेवारीच्या राज भवनावरील मोर्चात सामील होण्याचे आवाहन केल्याचे समन्वय समितीने सांगितले.
.....................