‘गुलाबपुष्प’तून उलगडणार कॉ. गणाचार्य यांचा इतिहास!
By admin | Published: May 16, 2017 01:04 AM2017-05-16T01:04:57+5:302017-05-16T01:04:57+5:30
मुंबईच्या कामगार चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कॉ. गुलाबराव गणाचार्य यांचे कार्यकर्तृत्व आणि जीवन प्रवासाचा इतिहास ‘गुलाबपुष्प’ या स्मृतिग्रंथातून उलगडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या कामगार चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कॉ. गुलाबराव गणाचार्य यांचे कार्यकर्तृत्व आणि जीवन प्रवासाचा इतिहास ‘गुलाबपुष्प’ या स्मृतिग्रंथातून उलगडणार आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक व धर्मादाय विश्वस्त संस्थेने दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात २१ मे रोजी सकाळी १० वाजता स्मृतिग्रंथाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत
सुनील गणाचार्य यांनी ही माहिती दिली.
गणाचार्य म्हणाले की, हा स्मृतिग्रंथ म्हणजे मुंबईच्या कामगार लढ्याचा एक ऐतिहासिक ऐवज असेल. या सोहळ्याला माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य, आमदार जयंत पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार आशिष शेलार, भाकपचे सचिव भालचंद्र कांगो, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, रिपाइंचे अविनाश महातेकर आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर
उपस्थित असतील. याशिवाय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्वस्त समिती संस्थेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येतील.
वर्षभर सुरू असलेल्या उपक्रमांत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ लेबर स्टडिज या संस्थेला १ लाख ११ हजार ११ रुपये इतकी रक्कम देणगी दिली जाणार आहे. या रकमेच्या व्याजामधून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्याला दरवर्षी विशेष पारितोषिक दिले जाईल. शिवाय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र व्यक्तीसही ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. कामगारांची बाजू मांडणाऱ्या वकिलास संस्थेकडून ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. आर्थर रोड येथील कॉ. गुलाबराव गणाचार्य चौकात कामगारांच्या स्मृती जतन करणाऱ्या देखण्या शिल्पाच्या उभारणीचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई ही कामगारांची आणि गिरणी कामगारांची असल्याने नव्या विकास आराखड्यात कामगारांचे, कष्टकऱ्यांचे काय स्थान असेल, यावर आॅगस्ट महिन्यात एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्याचा मानस अनिल गणाचार्य यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, या परिसंवादासाठी आजी-माजी महापौर, महापालिकेचे आजी-माजी आयुक्त, एमएमआरडीएचे अधिकारी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाईल. महापालिकेच्या मुख्यालयातच हा परिसंवाद घडवण्याचे प्रयत्न केले जातील.