Join us

स्वयंपाकी बनून फसवणारा गजाआड

By admin | Published: October 13, 2015 2:26 AM

एकाकी अथवा वयोवृद्ध नागरिकांच्या घरी स्वयंपाकी बनून घरातील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या ठगाला मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे

मुंबई : एकाकी अथवा वयोवृद्ध नागरिकांच्या घरी स्वयंपाकी बनून घरातील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या ठगाला मालमत्ता कक्षाने गजाआड केले आहे. अजय उर्फ चंचल सीताराम मंडल असे आरोपीचे नाव आहे. गोरेगाव परिसरातून त्याला रविवारी अटक केली.वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या घरकाम करणाऱ्या जाहिरातींमधून मंडल सावज शोधायचा. त्यानुसार गावदेवी येथील तक्रारदारांच्या घरात त्याने एप्रिल महिन्यात नोकरी मिळवली. तक्रारदाराचा विश्वास संपादन केल्यानंतर २० मे रोजी संधी साधून मंडलने घरातील १२ लाखांच्या ऐवज लंपास केला. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात मंडलविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. मंडल हा अभिलेखावरील आरोपी असून दादर, अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अंधेरी येथील गुन्ह्यात शिक्षा भोगून तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी मंडल जुहू येथील उच्चभ्रू वसाहतीत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अरुण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून मंडलच्या मुसक्या आवळल्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृत्तपत्रात घरनोकरबाबत असलेल्या जाहिराती बघून मंडल दलालामार्फत स्वयंपाकी म्हणून नोकरी मिळवत होता. नोकरी मिळाल्यानंतर मालकाचे विश्वास संपादन करत असे. संधी मिळताच घरातील लाखो रुपये घेऊन पळ काढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तो विशेषत: वयोवृद्धांसह एकटे राहत असलेल्या नागरिकांना टार्गेट करत असल्याचे तपासातून समोर आले. अशा प्रकारे त्याने मुंबई, नवी मुंबईसह ठाणे परिसरातील अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)