कूल... फर्स्ट क्लासच्या पासवर आता एसीचा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:22 AM2022-09-23T08:22:56+5:302022-09-23T08:23:24+5:30
मध्य रेल्वेकडून उद्यापासून अंमलबजावणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीचा पास एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिमकडून (क्रिस) चाचणी करण्यात येत होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, त्यानुसार मध्य रेल्वेकडून शनिवार, २४ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीच्या पासधारकांना आता आपला प्रथम श्रेणीचा पास एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा सुरु होत आहे. ही सुविधा फक्त प्रथम श्रेणीचा त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पासधारकांनाच मिळणार आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतर करण्यासाठी पासदरातील फरक भरून नवीन पास तिकीट खिडकीवर काढता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर प्रथम श्रेणीचा पास असणाऱ्या प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिमकडून (क्रिस) चाचणी करण्यात येत होती.
असे करा रूपांतर
मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या दिवसभरात ५६ फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ फेऱ्या चालविण्यात येतात. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीतील मासिक पासधारक एसी लोकलचा पास काढण्यासाठी गेल्यास त्याला फरकाचे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर हा पास एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतरित होणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजी
हार्बर मार्गावर एकही एसी लोकल नसल्याने हार्बर मार्गावरील प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या पासधारकांना या सुविधेचा कसलाही फायदा होणार नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयावर हार्बर-वासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.