मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:41 AM2019-07-01T01:41:07+5:302019-07-01T01:42:58+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसादरम्यान पडझडीच्या घटनाही सुरूच आहेत

 'cool' by rain to Mumbai and central Maharashtra | मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’

मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’

Next

मुंबई : रविवारी दिवसभर बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यामुळे मुंबईकरांनी सुट्टीचा दिवस घरात बसूनच घालविल्याचे चित्र होते. शुक्रवार, शनिवारसह रविवारी मुंबईलगतच्या तलाव क्षेत्रात जोरदार बरसलेल्या पावसाने मध्य महाराष्ट्रातही उत्तम कामगिरी केली. मराठवाडा आणि विदर्भात मात्र अद्याप पावसाने म्हणावा तसा जोर पकडला नसला, तरी येत्या आठवड्यात येथे पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसादरम्यान पडझडीच्या घटनाही सुरूच आहेत. रविवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार, शहरात ६, पूर्व उपनगरात १०, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १९ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. तर शहरात १७, पूर्व उपनगरात १०, पश्चिम उपनगरात १० अशा एकूण ३७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या आहेत. सायंकाळी ६ वाजता यात आणखी ४ घटनांची भर पडली.
रविवारी सकाळी आठच्या नोंदीनुसार, शहरात ३६, पूर्व उपनगरात २५ आणि पश्चिम उपनगरात ७८ अशा एकूण १३९ ठिकाणी झाडे कोसळली. सायंकाळी ६ वाजता यात आणखी ३९ घटनांची भर पडली.

अतिवृष्टीचीही नोंद
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात कोकणात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार, नाशिक, सांगली जिल्हा वगळता मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वसाधारणपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे २ ते ६ जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा, धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे.



राज्यासाठी अंदाज
१ जुलै : कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.
२-३ जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
४ जुलै : कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशासाठी अंदाज
१ जुलै : ओडिशामध्ये
अतिवृष्टी होईल.
१-२ जुलै : विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी होईल.
२ जुलै : तेलंगणामध्ये अतिवृष्टी होईल.
३ जुलै : पूर्व मध्य प्रदेशात अतिवृष्टी होईल.

मुंबईसाठी अंदाज
१-२ जुलै : मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title:  'cool' by rain to Mumbai and central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.