कूपर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी चार महिने वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:48+5:302021-02-11T04:07:48+5:30

महापाैरांची घेतली भेट; ठेकेदाराला दाखविणार बाहेरचा रस्ता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पूर्व येथील कूपर रुग्णालयात काम करणाऱ्या ...

Cooper Hospital contract staff four months without pay | कूपर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी चार महिने वेतनाविना

कूपर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी चार महिने वेतनाविना

Next

महापाैरांची घेतली भेट; ठेकेदाराला दाखविणार बाहेरचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरी पूर्व येथील कूपर रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी थेट महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे दाद मागितली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन येत्या मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास संबंधित कंपनीला कार्यमुक्त करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मे. रायझिंग फॅसिलिटी या कंपनीने चार महिने वेतन दिलेले नाही. तसेच या कंपनीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महापौरांची मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानुसार महापौर किशाेरी पेडणेकर आणि उपमहापौर ॲड. सुहास वाडकर यांनी बुधवारी कूपर रुग्णालयाला भेट देऊन संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

संबंधित कंपनीने यापूर्वीही दोन ते तीनवेळा कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले आहे. यापूर्वी मे महिन्यात कर्मचाऱ्यांनी कोविड काळात काम करूनही त्यांना वेतन मिळाले नव्हते. त्यावेळी महापौरांनी दखल घेतल्यानंतर यापुढे नियमित वेतन देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिल्याचे कर्मचाऱ्यांनी या बैठकीत निदर्शनास आणले. त्यानंतरही कंपनीने ऑक्टोबरपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी नाराजी कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे व्यक्त केली.

* कंपनीला १६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत.

महापौरांनी गंभीर दखल घेऊन येत्या मंगळवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन न दिल्यास संबंधित कंपनीला कार्यमुक्त करावे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कंपनीच्या बँकेतील अनामत रकमेतून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले. यापुढील काळात केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याची सूचनाही त्यांनी केली.

............................

Web Title: Cooper Hospital contract staff four months without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.