शिक्षण संस्थांना सहकार्य करणार - महापौर
By admin | Published: April 20, 2017 03:19 AM2017-04-20T03:19:18+5:302017-04-20T03:19:18+5:30
महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे प्रश्न मिटविण्यासाठी आपण सदैव सहकार्य करणार
मुंबई : महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे प्रश्न मिटविण्यासाठी आपण सदैव सहकार्य करणार असल्याचे सांगून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्राथमिक शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
विक्रोळी येथील विकास हायस्कूलच्या शालेय सभागृहात महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे मुखपत्र ‘शिक्षण प्रबोध’ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या मुखपत्राचे प्रकाशन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. मुखपत्र संपादक मंडळाचे सदस्य डॉ. प्रभाकर दंडवते यांनी मुखपत्राचे उद्दिष्ट विषद करताना असे नमूद केले की, महामुंबई शिक्षण संस्था संघटना गेली ३0-३५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून शैक्षणिक संस्थांच्या तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शिक्षणसंस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच संस्थाचालकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी संघटनेने हे मुखपत्र सुरू केले आहे. या मुखपत्राद्वारे शिक्षण क्षेत्रातील वीज बिल प्रश्न, शाळेचा संच मान्यतेचा प्रश्न, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यामधील त्रुटी, व इतर शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचे कार्य प्रभावीपणे होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महामुंबई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.म. राऊत यांनी भूषविले. शासन शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याने शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संस्थाचालकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संघटनेचे कार्यवाह सदानंद रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन संघटनेचे कार्यकारिणी सदस्य मुकुंद वैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन संघटनेचे सहकार्यवाह बाळासाहेब हांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी नगरसेवक उपेंद्र सावंत, संघटनेचे उपाध्यक्ष मारूती म्हात्रे, रमाकांत पांडे, सहकार्यवाह प्रा. विनय राऊत, अनिल जोशी, अविनाश तांबे, रमेश म्हापणकर, बाळासाहेब म्हात्रे, मधुकर नार्वेकर, सुरेश डावरे, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)