मुंबई- फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या
मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्योगांबाबत केंद्रातील नेत्यांशीही बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचीत केल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री उशीरा दोघांमध्ये संवाद झाला. महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना केली आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, बिलकूल आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सखोल चौकशी व्हावी- मनसेप्रमुख राज ठाकरे
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.