Join us

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:28 AM

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सहकारी संस्थेने दूध भुकटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २४ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला

मुंबई : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सहकारी संस्थेने दूध भुकटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २४ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी ५ कोटी वितरीतही झाले आहेत. मात्र या प्रकल्पासाठी सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.सुभाष देशमुख यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लोकमंगलचा राजीनामा दिला. सध्या त्यांचा मुलगा रोहन तेथील कारभार पाहतो. या लोकमंगलने बनावट कागदपत्रे जोडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुध भुकटी प्रकल्पासाठी २४.८१ कोटींचा अनुदान मंजूर करून घेतले आहे. त्यातील पाच कोटी संस्थेला मिळाले आहेत. मात्र या प्रकल्पासाठी संस्थेने सादर केलेली जमीन एन.ए. आॅर्डर, प्रदूषण परवाना, बांधकाम परवाना, अन्न व औषध प्रशासन परवाना, महाविरणचे परवानापत्रक, कारखाना अधिनियम परवाना ही कागदपत्रे बनावट आहेत. सोलापूर जिल्हा दूग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांनी ४ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. लोकमंगलची करमाळा, सांगोला, मंगळवेढा, बीबीदारफळ येथील दूध केंद्रेही सध्या बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.याची सखोल चौकशी व्हावी आणि तत्पूर्वी सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत काँग्रेस उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. या आरोपांबाबत मंत्री देशमुख यांची बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :सुभाष देशमुख