- शेफाली परब - पंडित
मुंबई - कोरोनावर नियंत्रण व जनजागृतीसाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. मात्र अनेक ठिकाणी उत्तुंग इमारतींमधील रहिवाशी असहकार्य करीत आहेत. तर कुठे स्वयंसेवकांशी संपर्क टाळण्यासाठी स्वतःच फॉर्म भरून दिले जात आहेत. यामुळे मोहिमेचे उद्दिष्ट अडचणीत आले आहे. परिणामी, बुधवारपासून अशा सोसायट्यांच्या आवारात शिबिराद्वारे रहिवाशांना तपासणी केली जाणार आहे.
मुंबईत १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण स्वयंसेवकांनी केल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र अनेक ठिकाणी उत्तुंग इमारतींमध्ये या स्वयंसेवकांना प्रवेश नाकारण्यात आल्याचेही समोर आले आहे. काही लोकांना आपली माहिती जाहीर करणे सुरक्षित वाटत नाही. तर स्वयंसेवकांमुळे संसर्ग होईल, अशी भीती काही रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती मिळवणे स्वयंसेवकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे.
यासाठी सुरू आहे सर्वेक्षण-
मुंबईतील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचे तापमान आणि प्राणवायूची पातळी स्वयंसेवक तपासत आहेत. एखाद्या सदस्यांमध्ये गंभीर आजार असल्यास कोणती काळजी घ्यावी? संसर्ग कसा टाळावा, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
उत्तुंग इमारतींमधील रहिवाशी संसर्गाच्या भीतीने स्वयंसेवकांना भेटण्यास तयार होत नाहीत. अनेक ठिकाणी असा विरोध झाल्यानंतर संबंधित इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रत्येक फ्लॅटमधील प्रत्येक सदस्याची माहिती घेऊन देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी आवश्यकता वाटल्यास पालिकेतील स्वयंसेवक स्वतः जाऊन रहिवाशाला तपासणार, असे स्पष्ट करण्यात आले आहे.- प्रशांत गायकवाड (सहायक आयुक्त, डी विभाग)
पेडर रोड, ब्रीच कॅंडी, मलबार हिल, ग्रँड रोड, मालाड, अंधेरी, वांद्रे, सांताक्रूझ, खार येथील इमारतींमधील रहिवाशांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पहिल्या सर्वेक्षणामध्ये स्वयंसेवकांना प्रवेश न देणाऱ्या सोसायट्यांच्या आवारात आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. अथवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत किंवा इंटरकॉमवरून प्रत्येक रहिवाशांची माहिती घेतली जात आहे. इमारतींमधील गंभीर आजार असलेले एकूण सदस्य आणि प्राणवायूची पातळी मिळवण्यात येत आहे.- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त)