जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:18 PM2023-12-28T14:18:48+5:302023-12-28T14:20:17+5:30
नवख्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालकपदावर झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती.
Gunaratna Sadavarte ( Marathi News ) : वकील गुणरत्न सदावर्ते यांना राज्याच्या सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या संचालकपदावर गुणरत्न सदावर्ते यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक सौरभ पाटील हे कार्यरत आहेत. मात्र पाटील यांची नियुक्ती कोणत्याही निकषात बसत नसल्याचे सांगत त्यांना संचालकपदावरून हटवण्याचे आदेश आता सहकार आयुक्तांकडून एसटी बँकेला देण्यात आले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा विजय झाला होता. त्यानंतर सदावर्ते यांचा नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाली. मात्र पाटील यांचं वय २५ वर्षांपेक्षाही कमी आहे. एकीकडे संचालकपदासाठी आरबीआयकडून ३५ वर्ष वयाची आणि किमान आठ वर्ष अनुभवाची अट असताना नवख्या सौरभ पाटील यांची झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांनी आक्रमकपणे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
"सहकारी बँकेत ६२ हजार सभासद आहेत, त्याच्या पाचशे शाखा आहेत व २३ हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी तिथे आहेत. कर्मचाऱ्यांना या बँकेच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा असते की, आरोग्या संदर्भातील कोणता प्रश्न उद्भवला, घर बांधण्यासाठी एखादे लोन घ्यायचे असेल तर आपल्याला मदत मिळावी. या सर्व गरीब कर्मचाऱ्यांना कुठल्याही नॅश्नलाईज बँकेतून कर्ज मिळत नाही, ही बँक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी रिजर्व बँकेने काही नियम टाकून दिले आहेत. कुठलाही एमडी ३५ वर्षांच्या खाली व ७० वर्षांच्या पुढे नको असे हे नियम आहेत. या बँकेत कंत्राटी पद्धतीने एक अनुभव नसलेल्या २२ वर्षांच्या तरुणाची एमडी पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर या बँकेने एक जाहिरात काढली व त्यात रिजर्व बँकेचे नियम शिथिल केले. चारशे ते पाचशे कोटींचे डिपॉजिट या बँकेतून काढण्यात आले व ही बँक आज अडचणीत आली आहे. सरकार यात लक्ष घालणार का? चुकीच्या निर्णय घेणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करणार का?" असा सवाल रोहित पवार यांनी सहकारमंत्र्यांना विचारला होता. त्यानंतर आता सहकार खात्याकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचं दिसत आहे.
सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेला पत्र लिहून सौरभ पाटील यांना आठवडाभरात संचालकपदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले असून याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा, असंही सांगण्यात आलं आहे.