नौसेना दिवस: मालवण येथील कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:32 AM2023-11-23T11:32:36+5:302023-11-23T11:33:47+5:30

शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा घेतला आढावा

Coordinate planning of Navy Day events at Malvan, Chief Minister orders | नौसेना दिवस: मालवण येथील कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

नौसेना दिवस: मालवण येथील कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व यंत्रणांना दिला.

नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीबाबत सह्याद्री अतिथीगृहातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, कॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉइस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, कमोडोर एस. के. रॉय, संदीप सरना, गोकुल दत्ता, आशिष शर्मा, विक्रम बोरा, कॅप्टन चैतन्य आदी उपस्थित होते.

बैठकीत नौसेना अधिकाऱ्यांनी या समारंभाच्या अनुषंगाने नियोजित विविध कार्यक्रम, त्यांची रूपरेषा आणि त्यातील वैशिष्ट्ये याबाबत सादरीकरण केले. या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांचा ४३ फूट उंचीचा भव्य पुतळा

सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा ४३ फूट उभारण्यात आला आहे. तसेच शिवछत्रपतींच्या देदीप्यमान जीवनकार्याचा आढावा घेणारी आर्ट गॅलरी साकारण्यात आली आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विदेशातील नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Coordinate planning of Navy Day events at Malvan, Chief Minister orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.