Join us  

‘सेतू’ साधणार डॉक्टर आणि रुग्णांमध्ये समन्वय

By admin | Published: February 01, 2017 2:32 AM

रुग्णांच्या तक्रारी आणि डॉक्टरांचे दुर्लक्ष यातून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताहेत. यावरच उपाय म्हणून रुग्णांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी

- स्नेहा मोरे, मुंबई

रुग्णांच्या तक्रारी आणि डॉक्टरांचे दुर्लक्ष यातून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताहेत. यावरच उपाय म्हणून रुग्णांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, रुग्णांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि डॉक्टर-रुग्णाच्या नात्यामध्ये समतोल राखण्यासाठी ‘सेतू’ प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे रुग्णांच्या असंख्य तक्रारी ‘धूळखात’ पडल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेकदा अन्यायाविरोधात कसा संघर्ष करावा याविषयी रुग्णांना माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजातील रुग्ण आणि डॉक्टर या दोन महत्त्वाच्या दुव्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका भक्कम व्यासपीठाची गरज भासल्याने त्याच विचारातून ‘सेतू’चा जन्म झाल्याची माहिती मेडिकल व्हिक्टीम आणि या प्रतिष्ठानच्या प्रमुख स्वयंसेविका श्रेया निमोणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.‘सेतू’च्या माध्यमातून मुख्यत्वे आणि प्राधान्याने रुग्णांच्या हक्काविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता शाळा, महाविद्यालये, निवासी वसाहती, शासकीय-अशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था अशा सर्व ठिकाणी कार्यशाळा, सेमिनार घेण्यात येतील. या प्रतिष्ठानअंतर्गत ‘फोरम फॉर पेशंट राईट्स’ हे अभियानही राबविण्यात येत असून, त्याचे विशेष पेज फेसबुकवर आहे. या प्रतिष्ठानमध्ये सध्या मुंबई शहर-उपनगरातील जवळपास १२ मेडिकल व्हिक्टीम्सचा समावेश आहे. शिवाय, विविध वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञ आणि विधिज्ञही प्रतिष्ठानचा भाग आहेत. प्रतिष्ठानचे कार्य सध्या राज्य पातळीपर्यंत सीमित असून, भविष्यात देशपातळीवर त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती निमोणकर यांनी दिली.लवकरच हेल्पलाइन ‘सेतू’च्या माध्यमातून जास्तीतजास्त रुग्ण आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून सामान्यांना प्रतिष्ठानपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. शिवाय, प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे कामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निमोणकर यांनी दिली.