जिल्हा परिषद निवडणुकांसाठी समन्वय समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 04:13 AM2019-12-27T04:13:15+5:302019-12-27T04:13:39+5:30
३० डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान होणार निवड : महाविकास आघाडीच्या प्रयोगाची होणार चाचपणी
मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील या निवडणुकांतही महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात ३० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम आहे.
या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि विनायक राऊत यांचा समावेश असणार आहे. तर, काँग्रेसकडून मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांचा समावेश असणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. गुरुवारी या समितीची मंत्रालयाजवळ पहिली बैठकही पार पडली. आदित्य ठाकरे वगळता अन्य सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते. सध्या भाजप आणि मित्रपक्ष सत्तेत असलेल्या जिल्हा परिषदांची संख्या १२ आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग झाल्यास राज्यभरातील स्थानिक पातळीवरील चित्र पालटणार आहे. २५ पैकी किमान २० ठिकाणी महाविकास आघाडीचे नियंत्रण येण्याची शक्यता आहे. यापैकी बीड, जळगाव, अहमदनगर, गडचिरोली, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर येथील जिल्हा परिषदांमधील चित्र बदलणार हे नक्की मानले जात आहे.
पालघरला ७ जानेवारीला निवडणूक
याशिवाय, ७ जानेवारी रोजी पालघर, अकोला, नंदुरबार, धुळे, वाशिम आणि नागपूर या सहा जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकासुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांतही महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.