समन्वयकपदाची जबाबदारी आयुर्वेद विस्तार अधिकाऱ्यांवर

By admin | Published: April 12, 2017 03:09 AM2017-04-12T03:09:48+5:302017-04-12T03:09:48+5:30

अवयवदानासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच या उपक्रमास चालना मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा अवयवदान समित्यांची

Coordinator's responsibility to Ayurvedic Extension Officers | समन्वयकपदाची जबाबदारी आयुर्वेद विस्तार अधिकाऱ्यांवर

समन्वयकपदाची जबाबदारी आयुर्वेद विस्तार अधिकाऱ्यांवर

Next

मुंबई : अवयवदानासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच या उपक्रमास चालना मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा अवयवदान समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे समन्वय अधिकारी म्हणून आयुर्वेद विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
राज्यभरातील शहरे व गावांमध्ये अवयवदानाचे महत्त्व पोहोचावे, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी ३0 आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महाअवयवदान अभियान राबविले होते. या अभियानात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यातूनच जिल्हास्तरावरही अवयवदानास चालना मिळावी, यासंदर्भातील कार्यवाही तत्परतेने व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अवयवदान समन्वय समितीची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर जिल्हा अवयवदान समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य असून, आयुर्वेद विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच अवयवदानासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती, विविध सामाजिक संस्था यांनाही आवश्यकतेनुसार या समितीमध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे. या समितीची आढावा बैठक दर तीन महिन्यांत एकदा होणार आहे.
जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष अवयवदान होण्यासाठी या समितीचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमण्याची सूचना करण्यात आली होती. या सूचनेनंतर समितीच्या समन्वयाची जबाबदारी आयुर्वेद विस्तार अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये समन्वय साधून ब्रेनडेड रुग्णांबाबत माहिती अद्ययावत ठेवण्याचे काम समन्वयक यांना करावे लागणार आहे. तसेच अवयवदानासंदर्भात रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन रुग्णालयांनी केले किंवा नाही, याची माहिती गोळा करण्याचे काम या अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Coordinator's responsibility to Ayurvedic Extension Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.