प्रेयसीसोबत भांडण झाल्याने वरळीत पोलिसाने गळफास घेत संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:34 AM2023-11-21T09:34:49+5:302023-11-21T09:35:08+5:30
प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठवला मेसेज अन् फोटो; पोलीस दलात उडाली खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रेयसीसोबत झालेल्या भांडणातून पोलिसाने वरळी पोलिस वसाहतीतील अभ्यासिकेत गळफास घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी रात्री घडली. आत्महत्येपूर्वी पोलिस शिपायाने प्रेयसीच्या एका मैत्रिणीला गळफास घेत असल्याचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहे.
वरळी पोलिस वसाहतीत इंद्रजीत साळुंखे (२७) हा कुटुंबीयांसोबत राहायचा. तो स्थानिक सशस्त्र पोलिस दलाच्या भोईवाडा येथे कार्यरत होता. वरळी येथील पोलिस तरण तलावाशेजारी असलेल्या अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक तपासात साळुंखे याचे गोरेगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीसोबत एप्रिल २०२३ पासून प्रेमसंबंध होते. रविवारी तो प्रेयसीला वरळी सी फेस येथे भेटला, त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर साळुंखेने प्रेयसीला दादर रेल्वे स्थानकावर सोडले. तेथे त्यांनी मोबाइल तपासला असता प्रेयसीने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीला गफळास घेत असलेले छायाचित्र त्याने पाठवले. तसेच आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवत आत्महत्या केली.
कुटुंबीयांचा जबाब नोंदवला
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी मृत पोलिसाच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला असून त्यांची कोणाविरोधात संशय व तक्रार नसल्याचे सांगितले आहे.
इन्स्टाग्रामवर चॅटिंगचा वाद
इंद्रजित अन्य मुलींसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून १९ नोव्हेंबर रोजी त्याचे सायंकाळी चारच्या सुमारास प्रेयसीसोबत भांडण झाले.
सायंकाळी साडेसहा वाजता प्रेयसीने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. रात्री दहा वाजता त्याने फोटो व्हॉट्सॲप करत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.