मुंबई : व्यापा-याला १६ तोळे शुद्ध सोन्याऐवजी तांबे दिल्याचा धक्कादायक प्रकार पायधुनीत उघडकीस आला. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू केला आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली असून, सोमवारी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार आहे.वाशीचे तक्रारदार व्यावसायिक लविन प्रकाश सेमलानी (३६) यांचा पायधुनी परिसरात सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईसह देशभरात त्यांचा व्यवहार चालतो. कुरियरच्या माध्यमातून ते सोन्याची देवाण-घेवाण करतात. याच पद्धतीने २१ फेब्रुवारी रोजी अक्कलकोटवरून बोलत असल्याचे सांगून प्रकाश नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने स्वत: सोने व्यापारी असून, प्रकाश ज्वेलर्सचा मालक असल्याचे भासवले.व्हॉट्सअॅपवर प्रकाश ज्वेलर्स हे नाव असलेले कार्डही पाठविल्याने सेमलानी यांचा विश्वास बसला. प्रकाशने सोन्याच्या मंगळसूत्राची डिझाइन आॅर्डर हवी आहे, असे सांगितले. त्यानुसार, सेमलानी यांनी त्यांना काही डिझाइन पाठविल्या. त्यातील १५ मंगळसूत्रांची निवड करून ती पाठविण्यास सांगितले. ते जवळपास १७ तोळ्याचे दागिने होते, त्या बदल्यात प्रकाश १६ तोळे शुद्ध सोने देणार होता. ठरल्याप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी सेमलानी यांनी प्रकाशपर्यंत दागिने पाठविले, तर प्रकाशकडील शुद्ध सोने सेमलानी यांना २३ तारखेला मिळाले. तपासणीत ते तांबे असल्याचे समोर आले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पुणे पोलिसांंनी घातल्या बेड्याआरोपीने पुण्यातही अशाच प्रकारे दोन ते तीन व्यापाऱ्यांना गंडविल्याप्रकरणी पुण्यातील फरासखान पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात त्याचे खरे नाव प्रकाश नसून, प्रीतम रमेश बाळगट उर्फ ओसवाल असे असल्याचे समोर आले. सोमवारी पायधुनी पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत.
राज्यभरातील व्यापारी टार्गेटवरसेमलानीसारख्या आणखीन दोघांना या ठगाने गंडविले. या प्रकरणी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, तसेच राज्यभरातील अनेक व्यापारी त्याच्या टार्गेटवर होते. त्यामुळे विविध पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली.