Join us

‘महाज्योती’च्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका केली कॉपी-पेस्ट; खासगी क्लासच्या टेस्ट सीरिजमधील प्रश्न उचलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 12:30 PM

‘महाज्योती’तर्फे रविवार, ३० जुलै रोजी एमपीएससी प्रशिक्षण प्रवेश परीक्षा पार पडली.

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) तर्फे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण प्रवेश परीक्षेत खाजगी क्लासेसच्या टेस्ट सिरीजमधील प्रश्न कॉपी करून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

‘महाज्योती’तर्फे रविवार, ३० जुलै रोजी एमपीएससी प्रशिक्षण प्रवेश परीक्षा पार पडली. एक हजार जागांसाठी झालेल्या या परीक्षेला राज्यभरातून ४० हजार विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. ‘महाज्योती’ने ही प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कष्ट न घेता खासगी क्लासेसच्या टेस्ट सिरीजमधील प्रश्न आणि त्याचे पर्याय जसेच्या तसे उचलून प्रश्नपत्रिका तयार केली, असा दावा या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.   

एमपीएससीची तयारी करणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. यासाठी ‘महाज्योती’तर्फे प्रशिक्षणपूर्व परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा खासगी क्लासमधील प्रशिक्षणाचा खर्च ‘महाज्योती’तर्फे केला जातो, तसेच विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.  

चौकशीचे आदेश ‘महाज्योती’च्या प्रश्नपत्रिकेतील बहुतांश प्रश्न खासगी क्लासच्या सराव प्रश्नपत्रिकेतील असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी चौकशीचे आदेश दिले असून, मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याप्रकरणी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून खुलासाही मागवण्यात येणार आहे.  

‘महाज्योती’कडे यंत्रणा असताना त्यांनी खासगी क्लासेसच्या टेस्ट सीरिजच्या आधारे प्रश्नपत्रिका काढू नये. याबाबत ‘महाज्योती’ने स्पष्टीकरण द्यायला हवे. त्यांनी त्यांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रश्नपत्रिका काढावी. - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती 

टॅग्स :विद्यार्थीपरीक्षा