CoranaVirus : "वेळेत निदान, उपचार झाल्यास मृत्यूदर कमी होईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:23 PM2020-04-25T22:23:45+5:302020-04-25T22:24:23+5:30
CoranaVirus : कोरोनामुळे मुंबई व मुंबई परिक्षेत्रात होणाऱ्या मृत्यूंची कारणमिमांसा व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई शहर उपनगरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये ७९ टक्के जणांना मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार आदीचा त्रास असल्याचे मुंबई महापालिकेने करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची कारणमिमांसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे. याच अहवालात वेळेत कोरोनाचे निदान होऊन रुग्णांना दाखल करून योग्य उपचार केल्यास मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी करता येईल असेही नमूद केले आहे.
कोरोनामुळे मुंबई व मुंबई परिक्षेत्रात होणाऱ्या मृत्यूंची कारणमिमांसा व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत डॉ सुभाष साळुंखे, डॉ साधना तायडे, डॉ मिलिंद नाडकर आदी डॉक्टरांचा समावेश असून एकूण १३३ मृत्यूंचे विश्लेषण करून या समितीने आपला अहवाल सादर केला. हा अहवाल प्राथमिक स्वरुपाचा असून पुढच्या टप्प्यात सखोल विश्लेषण असलेला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या निदानापासून ते मृत्यूचा कालावधी सरासरी ६.४ दिवस
एखाद्या रुग्णाला कोरोना झाल्यापासून ते मृत्यूचा कालावधी यातील सरासरी अंतर ६.४ दिवस एवढे आहे तर बरेच मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून अडीच दिवसात झाल्याचे दिसून आले आहे. डॉ सुपे समितीच्या अहवालानुसार बरेचवेळा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास रुग्णाला बराच कालावधी लागला आहे. यात सुरुवातीला ताप व खोकला आल्यावर रुग्णाने काही काळ घरगुती उपाय केले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांची औषधे घेतली व नंतर करोना चाचणी केल्यावर रुग्ण पालिकेच्या करोना रुग्णालयात दाखल होत आहेत. प्रामुख्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यास बराच वेळ लागत असल्याचे निरीक्षण या समितीने नोंदवले आहे
मृत्यूदर कमी कऱण्यासाठी ११ समितीच्या शिफारशी
कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी वेळेत निदान व तात्काळ उपचाराची व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे डॉ अविनाश सुपे यांनी आपल्या शिफारशीत नमूद केले आहे. डॉ सुपे समितीने एकूण ११ शिफारशी केल्या असून यात वेळेत निदान होणे, जास्त संख्येने चाचण्या करणे, रुग्णांचे वर्गीकरण करून उपचाराची व्यवस्था, उपचाराचे निश्चित धोरण ( प्रोटोकॉल) , डॉक्टर व परिचारिकांना पुरेशा विश्रांतीसाठी चक्रीकरण पद्धतीने रुग्णसेवा, मानसिक आरोग्याची काळजी तसेच रुग्णवाहिका सुविधा गतिमान करणे आदींचा समावेश आहे. या शिफाराशीत खासगी आरोग्य व्यवस्थेच्या सहभागालाही विशेष महत्व देण्यात आले आहे. चाचण्यांचा वेग वाढवणे, तात्काळ उपचार, ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासणी, तसेच रुग्णांना दाखल करण्यासाठी हेल्पलाईन आदी शिफारसी केल्या असून समितीने गेल्या आठवड्यात अहवाल सरकारला सादर केला आहे.
ही आहे समिती
मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक , जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.