Join us

पेंढ्याचे दोर झाले कालबाह्य

By admin | Published: November 17, 2014 10:32 PM

भातकापणीची लगबग सुरु झाली की शेतकऱ्याची रात्र पेंढ्याचे बंद वळण्यात जाते.

दासगाव : भातकापणीची लगबग सुरु झाली की शेतकऱ्याची रात्र पेंढ्याचे बंद वळण्यात जाते. पेंढ्यांची काडीन्काडी जुळवून मोठ्या मेहनतीने शेतकरी लावण्यवतीच्या वेणीप्रमाणे पेंढ्यांचा बंद विणून त्याचा वापर भाताचे भारे बांधण्यासाठी करीत असे. मात्र आता शेतकऱ्याने हाताने वळलेले हे बंद महाडमध्ये कालबाह्य झाले आहेत. येथील शेतकरी औद्योगिक वसाहतीतील सिंथेटिक कारपेटचे तुकडे भाताचे भारे बांधण्यासाठी वापरु लागला आहे. परंपरागत शेतीपद्धती ही पर्यावरणपूरक अशीच आहे. रासायनिक खतांच्या ऐवजी शेणखत, पालापाचोळ्याचा वापर केला जात असे. भात लावणीच्या वेळी, शेतातील कामाच्यावेळी पाऊस अगर उन्हापासून संरक्षणासाठी बांबूने विणलेले इरले आणि भाताचे पीक तयार झाले की त्याचे भारे बांधण्यासाठी पेंढ्याचे बंद वापरले जात होते. मात्र आता या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत. शेणखताच्या जागी रासायनिक खतं, बांबूने विणलेल्या इरल्याची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे. आता पेंढ्याने विणलेल्या बंदाची जागाही सिंथेटिक मटेरिअलपासून बनलेल्या कार्पेटच्या तुकड्यांनी घेतली आहे. पेंढ्याच्या बंदाचा वापर भाताचे भारे शेतापासून सुरक्षित ठिकाणी नेताना बांधण्यासाठी केला जातो. पेंढ्याचे हे बंद म्हणजे शेतकऱ्याच्या हातातील कलेचे दर्शन होते. पेंढ्याची एकएक काडी वेगळी करुन तिला एका दोरीप्रमाणे वळले जाते. त्या दोराने स्त्रियांच्या वेणीप्रमाणे बंद विणला जातो. कोठेही गाठ नसणारा हा पेंढ्याचा बंद दोरखंडाइतकाच मजबूत असतो. दिवसभर भातकापणीचे काम केल्यानंतर रात्री आराम करण्याऐवजी शेतकरी हे बंद वळण्याचे काम करीत असे. यामध्ये वेळ वाया जात असला तरी यासाठी शेतकऱ्याला पैसा खर्च करण्याची गरज नव्हती. केवढाही मोठा भारा असो त्याला गाठ मारायची गरज भासत नसे. केवळ एका पिळावर हा भारा बांधला जाई. भाताची झोडणी झाली की पुन्हा पेंढ्याच्या गंज्या बांधण्यासाठीही याच बंदाचा वापर केला जाई. मोठमोठ्या उडव्यादेखील या बंदाच्या भरोशावर शेतकरी बांधत असे. शेतकऱ्याच्या भरोशाचे हे बंद आता कालबाह्य झाले आहेत. त्यांची जागा आता औद्योगिक वसाहतीत बनणाऱ्या आणि कार, आॅफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक कार्पेटच्या तुकड्यांनी घेतली आहे. हे बंद सहज उपलब्ध होत असले तरी मजबुतीबाबत ते पेंढ्याच्या बंदापुढे फिके पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)