मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांविरोधातील तपास पूर्ण करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे सोमवारी मुदतवाढ मागितली. न्यायालयाने त्यांना ११ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले.कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली. या दंगलीबाबतचा पहिला गुन्हा अनिता साळवे यांनी पुण्याच्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदविला. सुरुवातीला पोलिसांनी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली. मात्र, भिडे यांना अटक करण्यात आली नाही.एकबोटे यांना अटक केल्यानंतर काही महिन्यांनी जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, भिडे यांच्यावर काहीच कारवाई न केल्याने साळवे यांनी भिडे यांनाही अटक करण्यात यावी, यासाठी अॅड. सुरेश माने यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. यापूर्वीच्या सुनावणीत पुणे पोलिसांनी तपास तीन महिन्यांत पूर्ण करू, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. मात्र, सोमवारच्या सुनावणीत पुणे पोलिसांनी हा तपास अंतिम टप्प्यात आला असून पूर्ण करण्यासाठी आणखी मुदतवाढ मागितली. त्यावर माने यांनी आक्षेप घेतला. पोलिसांना तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिने देण्यात आले होते. मात्र, या कालावधीत त्यांनी तपास पूर्ण केला नाही. त्यामुळे त्यांना आणखी मुदतवाढ देऊ नये, अशी विनंती माने यांनी न्यायालयाला केली.तपास पूर्ण न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. मात्र, पोलिसांनी सादर केलेली कागदपत्रे वाचल्यानंतर उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पूर्ण करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीत तपास पूर्ण करा, असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले.
कोरेगाव भीमा प्रकरण : तपासासाठी पुणे पोलिसांनी मागितली मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 6:11 AM