Join us  

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 4:58 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई-

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणं आढळून आली होती. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. यात चार जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चौघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यानं राहत्या घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना बाधित राजकीय व्यक्तींचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत १३ मंत्री आणि ७० हून अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच याबाबतची माहिती काल दिली होती. राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. कामानिमित्त त्यांना फिरावच लागतं. लोकांना भेटावच लागतं. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. 

एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, केसी पाडवी यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वरुण देसाई, प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :संजय राऊतकोरोना वायरस बातम्या