वरळी कोळीवाडा, धारावीत बंदोबस्त केलेल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:19 AM2020-04-22T10:19:28+5:302020-04-22T10:20:12+5:30
राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा वाढता आकड़ा चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा वाढता आकड़ा चिंतेची बाब ठरत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी नेमलेल्या अधिकारी महिला करोनाबाधीत निघाल्याने याचे गांभीर्य आणखीन वाढले. त्यातच वरळी कोळीवाडा, धारावी येथे बंदोबस्ताला असलेल्या दोन अमलदाराना कोरोनाचा संसर्ग
झाला आहे. तर दुसरीकडे पवई पोलीस ठाण्यातील कोरोना संशयित पोलिसाचा सोमवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ४९ वर गेला आहे. यात ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीमध्ये दहशत वाढते आहे. दादर पोलीस वसाहतीत राहणारे आणि वरळी कोळीवाडा येथे कर्तव्य बजावलेल्या शिपायाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या कुटुंबियानाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल पासून त्यांना त्रास सुरु झाला. त्यात ताप वाढल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव येताच ते राहत असलेल्या इमारतीचा भाग सील करण्यात आला आहे. तसेच ते कुणाच्या संर्पकात आले त्या पोलिसांची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे समजते. तर धारावी परिसरात बंदोबस्ताला असलेले माहिम पोलीस वसाहतील शिपायालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने येथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी धसका घेतला आहेत.
त्यात पवई पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय शिपायाच्या मृत्यूमुळे यात भर पड़त आहे. पवई पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेले पोलीस शिपाई यांना १५ एप्रिलपासून सर्दी, खोकला, ताप येत असल्याने ते रजेवर होते. सोमवारी जास्त त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी अपेक्षित असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. त्यांना कोरोनाचा झाल्याचा संशय वर्तविन्यात येत असून, त्यांच्या संपर्कत आलेल्यां पोलिसांची माहितीही गोला करण्यात आल्याचे समजते.
या घटना सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे बंदोबस्तासाठी नेमलेल्या पायधुनी पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या अधिकारी महिलेला करोनाची लागण झाली. बंदोबस्तापूर्वी होणाऱ्या चाचणीत त्यांना कोरोनाची लक्षण दिसून आली. पुढे चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या पायधुनी पोलीस ठाण्यातील १४ पोलिसांना पालिका अधिकाºयांनी क्वारंटाईनच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाबाधित पोलिसांचा वाढत्या आकडयामुळे मुंबईत सर्वात जास्त चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांना धीर देण्यासाठी सोमवारी धारावीत झालेल्या संचलनात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगही सहभागी झाले.
....
उत्तर प्रादेशिक विभागात ओपीडी
उत्तर प्रादेशिक विभागाच्या पुढाकाराने या भागात पोलिसांसाठी ओपीडी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची दैनंदिन तपासणी होऊ शकेल