लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पश्चिमेतील स्वामी विवेकानंद मार्गावरील एका हॉटेलमधील तब्बल दहा कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हे हॉटेल सील करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग मुंबईत वाढल्यानंतर हॉटेल, पब, व्यायामशाळा, लग्न समारंभ आदी ठिकाणी ५०पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये, असा नियम करण्यात आला आहे. या नियमाचे पालन होत आहे का? याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक विभाग कार्यालयामार्फत धाड टाकण्यात येत आहे. दरम्यान, अंधेरी येथील हॉटेलमधील ३५पैकी १० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा झाल्यानंतर पालिकेने बुधवारी हे हॉटेल सील केले. या सर्व कर्मचाऱ्यांवर वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत.दोनच दिवसांत सुरू झाले हॉटेल nइमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळल्यानंतर १५ दिवस संबंधित मजला अथवा संपूर्ण इमारत सील केली जाते. याकाळात इमारतीत दुसरा कोविड रुग्ण आढळल्यास हा कालावधी वाढवला जातो. मात्र, हे हॉटेल दोनच दिवसांत सुरू करण्यात आले. nयाबाबत विचारले असता, हॉटेलचे निर्जंतुकीकरण करून नव्या कर्मचाऱ्यांसह हॉटेल सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे हॉटेल सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.