मानखुर्दच्या बालगृहातील १८ मुलांना कोरोना; कोरोना काळजी केंद्रात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:14 AM2021-08-30T07:14:26+5:302021-08-30T07:14:41+5:30
कोरोना काळजी केंद्रात केले दाखल
मुंबई : मानखुर्द येथील बालगृहातील अठरा मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना परिसरातीलच कोरोना काळजी केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी भायखळा येथील लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मानखुर्द येथील बालगृहात १०२ लहान मुले आहेत. २५ ऑगस्ट रोजी शताब्दी रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. २६ ऑगस्ट रोजी शताब्दी रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले तर २७ ऑगस्ट रोजी करण्यात तपासणीत १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
‘काळजीचे कारण नाही’
याबाबत बालगृहाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, कोरोनाची लक्षणे निदर्शनास येत असल्याने २७ ऑगस्ट रोजी येथील लहान मुलांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांत येथील अठरा मुलांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यावर उपाय म्हणून स्थानिक परिसरातील कोरोना केंद्रावर त्यांच्या उपचार सुरू आहेत. याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.