Join us

इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैद्यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कारागृहातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला ३० मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तिची कोरोना चाचणी करताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. कारागृहाने तत्काळ कारागृहातील सर्व महिला, पुरुष कैद्यांसह कारागृह कर्मचारी, अधिकाऱ्याची चाचणी केली. त्यात इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैदी पॉझिटिव्ह आल्या आहेत. शुक्रवारी त्यांचा प्राथमिक अहवाल येताच, त्यांना कारागृहाच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलांना कुठलीही लक्षणे नसल्याचेही कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले, याबाबत कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहे. भायखळा महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्यभरातील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत ९ कैदी आणि ८ कारागृह कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यभरातील कारागृहात २५९ कैद्यांसह १०४ कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे.

* १,६८५ कैद्यांचे लसीकरण

महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. राज्यभरात आतापर्यंत १ हजार ६८५ कैदी आणि ३ हजार १४० कारागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहेत.

........................................