मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. सोमवारी २,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १,१८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बरे झालेल्या ११८५ रुग्णांपैकी सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळातील आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
दिवसभरात राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, एकूण संख्या १,६९५ झाली आहे. त्यामध्ये मुंबईमधील ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापुरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १ तसेच रत्नाागिरीमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. या ६० मृतांपैकी ४७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत; तर उर्वरित सहा मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
6,977 रुग्ण एका दिवसात
२४ तासांत देशात ६,९७७ रुग्ण आढळले. स्थलांतरित मजूर गावी गेल्यापासून देशात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात ४,०२४ जण मरण पावले असून, ५७,६९२ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३८ हजार ५३६ झाली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर कमी आहे.
भारत दहाव्या स्थानी
जगभरातील रुग्णसंख्या ५५ लाख ३१ हजारांवर गेली असून, आतापर्यंत ३ लाख ४७ हजार २२७ जणांचा बळी घेतला आहे. एकट्या अमेरिकेत आतापर्यंत ९९ हजार ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथे रुग्णसंख्या १६ लाख ९० हजार झाली आहे. आता रशिया आणि भारतात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.