मुंबई : मुंबईतील तीन रुग्णांमध्ये कोरोनाचा असा विषाणू आढळला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही (प्रतिपिंड) परिणाम होत नाही. खारघर येथील टाटा मेमोरियल केंद्रामध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेंट आढळून आला आहे. या म्युटेशनला ई४८४के या नावाने ओळखले जाते. टाटामधील वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, नव्याने आढळलेला हा विषाणू हा दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या (के४१७एन, ई४८४के आणि एन५०१वाय) या तीन म्युटेशनमधून आला आहे.
टाटा मेमोरियल केंद्राचे होमिओपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पाटकर यांनी सांगितले की, केंद्रातील तज्ज्ञांच्या चमूने ७०० कोविड नमुन्यांची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी केली. यापैकी तीन नमुन्यांमध्ये हा म्युटेंट आढळला. कोविडच्या या म्युटेंटवर जुन्या विषाणूमुळे शरीरात तयार झालेल्या तीन अँटिबॉडी (प्रतिपिंड) यावर प्रभावहीन आहे. असे असले तरी हा नवा विषाणू कमी धोकादायक असल्याचे मत जागतिक पातळीवरील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे, त्यामुळे कोरोनाविषयी भीती न बाळगता संपूर्णतः खबरदारी बाळगल्यास धोका कमी करता येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाला होता संसर्गn ज्या तीन रुग्णांमध्ये कोरोनाचा हा म्युटेंट आढळून आला होता ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संक्रमित झाले होते. तिघांचे वय ३०, ३२ आणि ४३ वर्षे आहे. यापैकी दोन रुग्ण रायगड आणि एक ठाण्यातील आहे. n यात दोघांमध्ये साधारण लक्षणे दिसून आली होती. ते होम आयसोलेशनमध्ये होते. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालाही ऑक्सिजन सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरची गरज भासली नव्हती.