Join us

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनामुळे आता लोकांच्या जीवनशैलीत बराचसा बदल झाला आहे. या आधी आरोग्याकडे दुर्लक्ष करत असणारी मंडळीही आता आपल्या ...

मुंबई : कोरोनामुळे आता लोकांच्या जीवनशैलीत बराचसा बदल झाला आहे. या आधी आरोग्याकडे दुर्लक्ष करत असणारी मंडळीही आता आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. यासाठी चांगला आहार, व्यायाम, तसेच स्वच्छता या गोष्टी आवर्जून पाळल्या जात आहेत. यामुळे आता किचनमध्ये बनणारे चमचमीत पदार्थ, फास्ट फूड व तेलकट पदार्थ जवळपास नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. याउलट आता लोक हेल्दी व चांगल्या दर्जाचे पदार्थ खाऊ लागले आहेत. त्यामुळे गृहिणीही आता प्रथिने, कार्बोदके व अनेक जीवनसत्त्वांचा समावेश असणारे पदार्थ दररोजच्या जेवणात बनवू लागले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर जवळपास सर्वच घरातील स्वयंपाकघरात बदल झाला आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

कोरोनाच्या आधी किचनमध्ये तेलकट, गोड व मैदारहित चमचमीत पदार्थ जास्त प्रमाणात बनवले जात असत. मात्र, आता आरोग्याच्या दृष्टीने किचनमध्ये पालेभाज्या, मांस, अंडी, कडधान्ये, फळे, पनीर, काढा व हेल्दी सूप यांचे प्रमाण वाढले आहे. बाजारात गेल्यावर गृहिणीही या वस्तू खरेदी करू लागल्या आहेत.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी दररोज व्यायामासोबतच चांगल्या आहाराचीही गरज आहे. त्यासाठी जेवणात दररोज कडधान्य, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, गरम मसाल्याचे पदार्थ, व्हिटॅमिन सी वाढविण्यासाठी संत्र, मोसंबी व लिंबू यांचे नियमित सेवन, पनीर, दूध मांसाहारी असल्यास मांस, अंडी हे रोजच्या जेवणात असायला हवे, असे आहार तज्ज्ञ प्रशांत पाटील यांनी सांगितले.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

फास्ट फूडमुळे आरोग्य बिघडत असल्याने, आता मागील दोन वर्षांमध्ये फास्ट फूडवर जणू अघोषित बंदीच आली आहे. यामुळे वडापाव, भजी, चायनीज पदार्थ, फ्रँकी, बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी असे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण घटले आहे.

मुक्ता नागरगोजे - घरातील सर्व सदस्यांना आता हेल्दी खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे दररोज चांगले गरम केलेले हेल्दी फूड घरात खाल्ले जात आहे.

पल्लवी शिरसाट - घरातून आता अतिगोड, तेलकट, मैदारहित पदार्थ हद्दपार झाले आहेत. याऐवजी आता घरात पालेभाज्या, अंडी, मांस खाल्ले जाते, तसेच व्यायाम करण्यावरही भर दिला जात आहे.

छाया जाधव - मुलांना आता फास्ट फूड खाण्याची इच्छा झाली, तरीही उकडलेले कडधान्य, पनीर यांचेच फास्ट फूड करून खाऊ घातले जाते. बाहेरचे कोणतेही खाद्यपदार्थ घरात आणण्यास मनाई केली आहे.