पुन्हा कोरोना; जीव सांभाळा, पालिका प्रशासन; मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:53 AM2021-02-14T01:53:28+5:302021-02-14T01:53:50+5:30
CoronaVirus News In Mumbai : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आला असून, सर्वसामान्यांकरिता लोकलच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत.
मुंबई : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीवर बंधने घालून कमी करण्यात आलेला कोरोना रुग्णांचा आकडा सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू केल्यापासून पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने केले आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आला असून, सर्वसामान्यांकरिता लोकलच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक आता लोकलने प्रवास करू लागल्याने साहजिकच गर्दी वाढली आहे.
दुसरीकडे लोकलवर ताण येत असून, रिक्षा, टॅक्सी आणि बेस्टवरचा ताण कमी होत आहे. मात्र, हे प्रमाण कमी आहे. तिसरीकडे घाटकोपर मेट्रोच्या संख्येने वेग पकडला असून, यातही भर पडली आहे. विशेषत: सर्वसामान्यांसाठी सुरू झालेल्या लोकलनंतर कोरोना पुन्हा एकदा पसरत आहे.
विनामास्क प्रवाशांचे करायचे काय?
लोकलमधून प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी मास्क घालण्याचे टाळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे. सामाजिक अंतराचे तर येथे तीनतेरा वाजले आहेत. रेल्वेस्थानकांवरदेखील अनेक प्रवासी विनामास्क आढळून येत आहेत. स्वत:हून यांनी मास्क परिधान केले पाहिजेत. मात्र, याबाबत निष्काळजीपणा बाळगला जातो.
बेस्टमध्ये कुठे आहे मास्क?
बेस्टमध्ये बसलेले प्रवासीदेखील सहज आपला मास्क नाका-तोंडावरून खाली उतरवितात. बहुतांश चालक विनामास्क असतात. वाहकांनी मास्क परिधान केलेला असतो. ज्या प्रवाशांनी मास्क परिधान केलेला नाही अशांना वाहक हटकतात. मात्र, ते तेवढ्यापुरते असते. पुन्हा काही प्रवाशांचा मास्क हनुवटीवर येतो.
हॉटेलमध्येदेखील मास्क टेबलवर
हॉटेलमध्ये पोटपूजा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनी जेवणाची वेळ वगळता उर्वरित काळात मास्क परिधान करणे गरजेचे आहे. मात्र, आत प्रवेश केल्यानंतर बैठक व्यवस्थेच्या टेबलवर पद्धतशीरपणे मास्क काढून ठेवला जातो.
बाजारात मास्क झाला गायब
रेल्वेस्थानके आणि मोठ्या बाजारपेठा वगळता मुंबईच्या बहुतांश कानाकोपऱ्यात सकाळी आणि सायंकाळी बाजार भरतो. या बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहक बिनधास्त विनामास्क वावरत असतात. शिवाय विक्री करणारे व्यापारीदेखील विनामास्क असतात. सामाजिक अंतराचे नियम येथे पूर्वी पाळले जात नव्हते आणि आजही पाळले जात नाहीत.
रिक्षा आणि टॅक्सीदेखील विनामास्क
रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणारे प्रवासीदेखील मास्क घालत नाहीत. चालकांनी मास्क घातलेला असतो. मात्र, तोदेखील हनुवटीवर आलेला असतो. कुठे एखादा क्लीनअप मार्शल आढळला तर मात्र मास्क परिधान करण्याचे कष्ट घेतले जातात.
कोणी कोणाला हटकत कसे नाही...
रेल्वे, बेस्ट, रिक्षा, टॅक्सीसह सार्वजनिक ठिकाणी बहुतांश नागरिक मास्क परिधान करत नाहीत. कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही कोणी कोणास मास्क परिधान करा, असेही सांगत नाही आणि कोणी तशी सूचना केलीच तरी परिधान केलेला मास्क काही कालावधीपुरता असतो.