कोरोना कवच मिळणार ५०० ते ६,००० रुपयांत! स्वतंत्र पॉलिसीसाठी ३० विमा कंपन्यांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:46 AM2020-07-12T03:46:49+5:302020-07-12T06:26:34+5:30

कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना दिले होते.

Corona armor for Rs 500 to Rs 6,000! Permission for 30 insurance companies for separate policy | कोरोना कवच मिळणार ५०० ते ६,००० रुपयांत! स्वतंत्र पॉलिसीसाठी ३० विमा कंपन्यांना परवानगी

कोरोना कवच मिळणार ५०० ते ६,००० रुपयांत! स्वतंत्र पॉलिसीसाठी ३० विमा कंपन्यांना परवानगी

Next

मुंबई : कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयांतील उपचारांवर होणाऱ्या वाढत्या खर्चाची दहशत कमी करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीे आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) ३० विमा कंपन्यांना कोरोना कवच ही विशेष आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध करण्याची परवानगी शुक्रवारी दिली.
विम्याची मुदत, विमाधारकाचे वय आणि विमा कव्हरनुसार ४५० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरून ही पॉलिसी घेता येईल. साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिने या तीन प्रकारच्या अल्प मुदतीच्या पॉलिसीतून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे कव्हर विमाधारकांना मिळू शकेल.
कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना दिले होते. ‘आयआरडीएआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कंपन्यांनी तयार केलेल्या कोरोना कवच या पॉलिसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर, कोरोना रक्षक ही दुसरी पॉलिसी येत्या काही दिवसांत मंजूर होईल. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही स्वरूपात ही पॉलिसी घेता येईल. पती-पत्नी, आई-वडील, सासूसासरे आणि २५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा कौटुंबिक पॉलिसीत समावेश करता येईल. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे १५ दिवस आणि डिस्चार्जनंतर ३० दिवसांतील औषधोपचारांच्या खर्चाचा परतावाही त्यातून मिळेल. रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या, मात्र १५ दिवसांपर्यंत घरीच उपचार घेतलेले, सरकारने कोरोना उपचारांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांतील उपचार खर्चाचा परतावासुद्धा त्यातून दिला जाईल. भौगोलिक ठिकाणानुसार प्रीमियमच्या रकमा बदलता येणार नाहीत.
वैद्यकीय सेवांमध्ये सक्रिय असलेल्यांना पाच टक्के सवलत असेल. पीपीई किटसह उपचारांसाठी वापरल्या जाणाºया सर्व प्रकारच्या कन्झ्यूमेबल गुड्सच्या बिलांचा परतावाही विमा कंपन्यांना कोरोना कवचच्या पॉलिसीधारकांना द्यावा लागेल. कोरोना कवच या पॉलिसीसाठी विमा कंपन्यांचे दर वेगवेगळे असतील.

वय जेवढे लहान
तेवढा प्रीमियम कमी
५० हजारांचे कव्हर असलेली पॉलिसी साडेतीन महिन्यांच्या कमीत कमी कालावधीसाठी घ्यायची असल्यास त्याचा जीएसटीसह किमान प्रीमियम साधारणपणे ५०० रुपयांपर्यंत असेल, तर साडेनऊ महिन्यांसाठी पाच लाखांची पॉलिसी घ्यायची असेल तर ती रक्कम ६ हजारांपर्यंत जाईल. विमाधारकांचे वय जेवढे कमी असेल तेवढा प्रीमियम कमी असेल. वय, पॉलिसीचा कालावधी आणि विम्याचे कव्हर जसे वाढत जाईल तसे प्रीमियमची रक्कमही वाढेल, अशी माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे.

Web Title: Corona armor for Rs 500 to Rs 6,000! Permission for 30 insurance companies for separate policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.