Join us

कोरोना : मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर कमी होऊन ०.९० टक्क्यांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 4:27 PM

कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव मंदावला; सक्रिय रुग्णांची संख्या घटतेय

मुंबई :  मुंबईतील रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता ०.९० टक्के असा कमी झाला आहे.  एकूण २४ विभागांपैकी ४ विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरवर असून तो २ विभागात नव्वदवर, ६ विभागात ८० वर, ५ विभागात ७० वर आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दरही २४ पैकी १८ विभागात १ टक्के पेक्षा कमी आहे. रुग्ण दुप्पट होण्यासाठी अधिक कालावधी म्हणजे संसर्गाचा फैलाव तितकाच मंदावला, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधीदेखील सातत्याने वाढता असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक आहे, असा दावा पालिकेने केले आहे.

कोविड १९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक प्रयत्न करत आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता कमी झाला आहे. प्रारंभापासून अधिकाधिक चाचण्या म्हणजे खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन रुग्ण आढळण्याची सरासरीदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. सोबतच प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. दरम्यान, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील २४  वॉर्डात वाॅर रूम कार्यान्वित करण्यात आल्यानंतर मुंबईतील कोविड रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आणि वेळच्या वेळी औषधोपचार मिळणे  याचे यशस्वी नियोजन झाले. ज्यामुळे मुंबईतील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यास देखील मोठी मदत झाली आहे. या वाॅर्ड रुमचे कार्य नक्की कसे चालते? हे समजावून घ्यायचे असेल आणि इतर ठिकाणीही अशा वाॅर रुम तयार करायच्या असतील तर अवेअरनेस फिल्म पाहाव्यात, असे आवाहन पालीकेने केले आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत फिल्म आहेत.

-------------------------------

  • ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली.
  • ३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
  • १ जून रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
  • १ लाख ते २ लाख हा टप्पा गाठण्यासाठी २५ दिवस लागले.
  • २४ जून रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला.
  • २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला.
  • १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला.
  • ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला.
  • २९ जुलै रोजी ५ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
  • ४ लाख ते ५ लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या १५ दिवसांमध्ये गाठण्यात आला. 
टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यामुंबईलॉकडाऊन अनलॉक