मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत पुन्हा शिरकाव करणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०५ टक्के उरला आहे. तर पाच हजार ७७९ सक्रिय रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर हॉटस्पॉट ठरलेल्या चाळी - झोपडपट्ट्या कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या केवळ पाच बाधित क्षेत्रे मुंबईत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्ण असलेल्या चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यास पालिकेने सुरुवात केली. आतापर्यंत २,७८९ बाधित क्षेत्रे प्रतिबंधमुक्त करण्यात आली आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे प्रमाण इमारतींमध्ये सर्वाधिक होते. तर चाळी - झोपडपट्ट्यांमध्ये प्रादुर्भाव अत्यंत कमी आढळून आला.
जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधित रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण, बाधित चाळी व झोपडपट्ट्यांमधील निर्जंतुकीकरण, सार्वजनिक शौचालयांची नियमित सफाई अशा उपाययोजनांनंतर बाधित क्षेत्रांचे प्रमाण आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतके राहिले आहे. आता केवळ गोवंडीत दोन तर भांडुप, कांदिवली आणि भायखळा येथील प्रत्येकी एक अशी पाच बाधित क्षेत्रे उरली आहेत.
१,८७९ मजले प्रतिबंधित
पालिकेच्या नियमानुसार बाधित रुग्णांचा आकडा पाचपेक्षा कमी असल्यास त्या इमारतीचा बाधित मजला सील केला जात आहे. त्यानुसार मुंबईत आता १,८७९ मजले प्रतिबंधित आहेत. सर्वाधिक सील मजले कांदिवली, अंधेरी पश्चिम, मालाड, अंधेरी पूर्व, मुलुंड या भागांमध्ये आहेत. तर सील इमारतींची संख्या ६१ आहे.
६१ इमारती सील
- मुंबईतील चाळी व झोपडपट्टीमधील पाच विभाग प्रतिबंधित आहेत. यामुळे ४४ हजार लोकसंख्या सध्या प्रतिबंधित क्षेत्रात आहे.
- सध्या ६१ इमारती सील आहेत. त्यामुळे येथील १६ हजार लोकसंख्या प्रतिबंधित क्षेत्रात आहे.
- १,८७९ मजले सील असल्याने येथील दोन लाख ८६ हजार लोकसंख्या प्रतिबंधित क्षेत्रात आहे.