Join us

कोरोनामुळे रेल्वेमार्गावरील अपघाती मृत्यूला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM

काेराेनाचा सकारात्मक परिणाम : वर्षभरात १,११६ प्रवाशांनी गमावला जीवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत लोकलमधून दररोज ८० लाखांहून ...

काेराेनाचा सकारात्मक परिणाम : वर्षभरात १,११६ प्रवाशांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत लोकलमधून दररोज ८० लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रवाशांच्या लाेकल प्रवासास निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ मर्यादित घटकांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये रेल्वेमार्गावरील अपघातांच्या संख्येत ६५ टक्क्यांनी घट झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे जानेवारी ते डिसेंबर दरम्यान लोकलमधून पडून किंवा रेल्वेमार्ग ओलांडताना किती लोकांच्या मृत्यू किवा जखमी झाले, याची माहिती मागितली होती. यासंदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली. त्यानुसार, २०२० या वर्षात लोकलमधून पडून किंवा रेल्वेमार्ग ओलांडताना एकूण १,११६ प्रवाशांना जीव गमावावा लागला. यात ९८३ पुरुष व १३३ महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसेच ८७८ प्रवासी जखमी झाले. यात ६८८ पुरुष व १९० महिला प्रवाशांचा समावेश आहे. २०१९ मध्ये एकूण २,६६४ प्रवाशांच्या मृत्यू झाला हाेता तर, ३,१५८ जखमी झाले होते.

२०२० मध्ये मध्य रेल्वेमार्गावर एकूण ७४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५२३ प्रवासी जखमी झाले. तर, पश्चिम रेल्वेमार्गावर ३६९ प्रवाशांचा मृत्यू आणि ३५५ प्रवासी जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेमार्गावरील अपघातांच्या संख्येत ६५ टक्क्यांनी घट झाली.

* सुरक्षा भिंत बांधण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - अहमद

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंत बांधण्याचा आदेश दिला आहे. परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप शकील अहमद यांनी केला. तसेच अजून किती प्रवाशांचा जीव गेल्यावर रेल्वे प्रशासन लक्ष देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

........................