केवळ ५० टक्केच हाेताे व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे रिक्षाचालकांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बहुतांश रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून, आजही त्यांचा गाडा रुळावर आलेला नाही. मुळात दहा महिन्यांमध्ये थकलेले बँकेचे हप्ते भरायचे की घर चालवायचे? असा प्रश्न त्यांना पडला असून, किमान बँकांच्या हप्त्याबाबत थोडातरी दिलासा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
मुंबईच्या उपनगरात अंतर्गत वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर केला जाताे. पश्चिम उपनगर असो किंवा पूर्व उपनगर, येथे रिक्षाचालकांचे मोठे जाळे आहे. मात्र, कारोनामुळे रिक्षाचालकांचे हाल झाले. दहा महिने हाेऊनही बँकेचे हप्ते भरता आलेले नाहीत. घर नीट चालविता येत नाही. आता रिक्षा सुरू झाली असली तरी दहा महिन्यांची कसर कशी भरून काढायची? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत.
काही अटी-शर्तींसह सर्वसामान्यांसाठी लाेकल सुरू झाल्याने हळूहळू दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. तरी तब्बल ५० टक्के धंदा बसल्याची माहिती रिक्षावाल्यांनी दिली. दिवसाला कसाबसा ५० ते ६० टक्के धंदा होत असून, रस्त्यावरही केवळ ७० टक्के रिक्षा उतरल्या आहेत.
रिक्षाचे भाडे जास्त असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना ते परवडत नाही. परिणामी आजही मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा बऱ्यापैकी रिकाम्या धावत आहेत. शेअर रिक्षालाही शेअर प्रवासी मिळत नाहीत. परिणामी भवितव्य धूसर असल्याची भीती रिक्षाचालकांना आहे.
मुंबई ते ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील अनेक रिक्षाचालकांनी प्रवासी कमी झाल्याचे सांगितले. ६० ते ७० टक्के रिक्षा रस्त्यावर असल्या तरी जेथे दिवसाला १०० रुपये मिळत होते तेथे आज फक्त ५० ते ६० रुपये धंदा होत आहे. जो होतो तोदेखील कसाबसा होतो, असे या मार्गावरील रिक्षाचालकांनी सांगितले.
बँकेचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. बँक काही दिलासा देण्यास तयार नाहीत. कर्जाचा डोंगर आहे. मुद्दल राहिली बाजूला, व्याज भरणेही कठीण झाले आहे. दिवसभरात ४०० ते ५०० रुपयेही कमाई हाेत नाही. यात घर चालवायचे की बँकेचे हप्ते भरायचे? सर्व रिक्षाचालकांची हीच परिस्थिती आहे. आमच्यासाठी कोणीतरी काहीतरी केले पाहिजे. आम्हालाही मदत मिळाली पाहिजे.
- राज कुमार, रिक्षाचालक
दहा महिने रिक्षा बंद होती. खूप अडचण आली. घरी इतर कोणी कमावते असेल तर अडचण येत नाही
- भाऊ उतेकर, रिक्षाचालक
पेट्रोल : ९४.६४
डिझेल : ८५.३२
एकूण रिक्षा : मुंबईत २.५ लाख रिक्षा आहेत.
...................................