-राज चिंचणकर मुंबई : लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात नाट्यगृहे बंद झाल्याने त्याचा फटका पडद्यामागील कर्मचाऱ्यांनाही बसला आणि या काळात रंगभूमीवरील बॅकस्टेजचे हे कर्मचारी बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
नाट्यसृष्टीशी संबंधित विविध संस्था आणि व्यक्तींनी या कलाकारांना आर्थिक मदत दिलीही; परंतु त्यात या मंडळींची किती गुजराण होणार हा प्रश्न होताच. हातावर पोट असणाऱ्या यातील काही कलाकारांनी मग शक्कल लढवत विविध उद्योगांची कास धरली. कुणी कांदे-बटाटे विकले; कुणी काही वस्तू विकल्या; तर कुणी भाजीची गाडी लावली.
आता मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे उघडण्यास परवानगी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष नाटकांचे प्रयोग होण्यास अजून बऱ्यापैकी अवधी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळसण कसा साजरा करायचा, हा प्रश्नही या पडद्यामागील कलाकारांना भेडसावत आहे. एकंदर पाहता, पडद्यामागील कलाकारांची यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी होईल, असेच चित्र-नाट्यसृष्टीत सध्या दिसून येत आहे. आता रंगभूमीवर प्रत्यक्ष नाटक कधी सुरू होईल, याकडे पडद्यामागील तमाम कलाकारांचे लक्ष लागून राहिले आहे.