मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या माध्यमातून जनतेला लुटण्याचं धंदे सुरु आहेत असा आरोप विरोधकांकडून सरकारवर केला जात आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कुपर हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांमधील हा संवाद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याबाबत नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईतील कुपर हॉस्पिटलच्या २ डॉक्टरांमधील हा संवाद आहे. त्यामुळे आम्ही वारंवार जे सांगतोय ते पुन्हा एकदा खरं झालं, कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार पैसे कमविण्याचा धंदा करतंय असा आरोप त्यांनी केला. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओ जोडला आहे. या व्हिडीओत दोन डॉक्टर एकमेकांशी संवाद साधताना ऐकायला मिळत आहे.
या व्हिडीओत डॉक्टर म्हणतात की, कोरोनाच्या नावाखाली धंदा सुरु केला आहे, क्वारंटाईन सेंटर, कोविड सेंटर या माध्यमातून २५-३० कोटी रुपये खर्च करुन महापालिकेचा पैसा संपवून टाकला आहे, आम्ही, डीन कोविड सुविधा केंद्रात जातो, ते पाहून हे काय चाललंय? हा धंदा सुरु आहे, सरकारला कोरोना संपवायचा नाही, नाहीतर धंदा बंद होईल. स्वत:चं अर्थकारण भरलं जात आहे, त्यांना जगाच्या अर्थकारणाशी देणंघेणं नाही. पैसा खर्च केलाय तो आला पाहिजे असं राजकीय नेते वागत आहेत असं व्हिडीओत म्हटलं आहे.
यापूर्वीही नितेश राणे यांनी ठाकरे पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले होते. कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड