गेल्या चार महिन्यांत कोरोना बळींत ८२ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:25+5:302021-02-16T04:08:25+5:30
गंभीर रुग्णांचे प्रमाण झाले कमी; आराेग्य विभागाची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या चार महिन्यांत शहर, उपनगरात कोरोनामुळे ...
गंभीर रुग्णांचे प्रमाण झाले कमी; आराेग्य विभागाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या चार महिन्यांत शहर, उपनगरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८२ टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे, गंभीर रुग्णांचेही प्रमाण कमी झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परिणामी, त्वरित तपासणी आणि उपचारांच्या मदतीने डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशस्वी होत आहेत.
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम मुंबईवर झाला. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११ हजार ४०७ जणांना जीव गमवावा लागला. ऑक्टोबरच्या तुलनेत जानेवारीपर्यंत मृतांच्या संख्येत मोठी घट झाली. २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूमुळे एकूण १२८१ रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२१ मध्ये २२६ रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. यासह जानेवारीत मासिक मृत्यू दर १४ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खाली आला.
* मार्गदर्शक तत्त्वांचे किमान वर्षभर पालन करणे गरजेचे
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील मृत्यूचे प्रमाण १.४ टक्क्यांवर पोहोचले आहे, जे यापूर्वी खूपच जास्त होते. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही बरेच नियोजन केले आणि त्यावर फक्त काम केले नाही तर नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने मृत्यूची संख्याही लक्षणीय खाली आली आहे. मात्र कोविडच्या संसर्गाबाबत गाफील राहून चालणार नाही. मास्कचा वापर, स्वच्छता आणि सामाजिक अंतर राखणे ही कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे किमान पुढील वर्षभर पाळणे गरजेचे आहे.
* महिना मृत्यू मृत्युदर (टक्क्यांत)
ऑक्टोबर १२८१ १४.२
नोव्हेंबर ५३५ ५.२०
डिसेंबर २९७ २.७४
जानेवारी २२६ २.०३
--------------------------