लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षीपेक्षा अधिक धोकादायक पद्धतीने देशाला ग्रासले आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे जनतेच्या आरोग्यासोबतच देशभरातील उद्योग, व्यवसाय ही आता अधिक मोठ्या संकटात सापडले आहेत. यामुळे अनेक लघु व मध्यम उद्याेग आणि त्यावर आधारित इतर व्यवसाय आता आणखी अडचणीत यायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बाजारातील अनेक वस्तूंची मागणी रोडावल्यामुळे औद्योगिक उत्पादनही घटले आहे. याचा परिणाम आता पॅकेजिंग इंडस्ट्री आणि त्यावर अवलंबून असलेली पॅकेजिंग पेपर व क्राफ्ट पेपर इंडस्ट्रीवर दिसू लागला आहे. कोरोनामुळे पॅकेजिंग पेपर उद्योगावर संकटात आलेला आहे.
शहरातील मॉल, शॉपिंग सेंटर बंद असल्याने वस्तूंची मागणी ठप्प झाली. यामुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीतील मागणीही ठप्प झाली. त्याचप्रमाणे बंद असलेली वाहतूकही याला कारणीभूत ठरली. पॅकेजिंग इंडस्ट्रीला लागणारा कच्चा माल हा भारताबाहेरून येतो. मात्र भारताबाहेरून येणारा कच्चा मालही थांबल्याने व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
क्राफ्ट पेपर उद्योग कोरोना संकटातून मागील वर्षाच्या शेवटास आणि २०२१ च्या पहिल्या तिमाहीत सावरत होता. मात्र कोरोनाने पुन्हा कहर केल्याने क्राफ्ट पेपरच्या मागणीत घट झाली. कोरोनामुळे औद्योगिक उत्पनातील घट, बाजारातील निरूत्साह यामुळे या पॅकेजिंग पेपर उद्योगाचे भविष्य झाकोळले आहे. बांधणीसाठी लागणारा १८ श्रेणीच्या क्राफ्ट पेपरची किंमत ३८ रुपये होती. परंतु मागणीत घट झाल्याने क्राफ्ट पेपर ३४ रुपये किमतीत विकावा लागत आहे. किमतीमधील ही घसरण अशीच सुरू राहण्याची चिन्हे असून ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे पॅकेजिंग पेपर उद्योगातील माहितीगार सुनील अगरवाल यांनी सांगितले. कोरोनामुळे क्राफ्ट पेपर मिल्सना क्राफ्ट पेपरचा दर नाईलाजास्तव आणखी खाली आणावे लागतील असे पेपर कमिटी ऑफ मेटल रिसायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ललित गर्ग यांनी सांगितले.
.................................