कोरोनामुळे लहान मुलांमध्ये वाढली लठ्ठपणाची समस्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:27+5:302021-07-05T04:05:27+5:30

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभर बंदची परिस्थिती उद्भवली होती. यामुळे दळणवळण, सर्व कार्यालये, महाविद्यालये व शाळा ...

Corona causes obesity problem in young children! | कोरोनामुळे लहान मुलांमध्ये वाढली लठ्ठपणाची समस्या!

कोरोनामुळे लहान मुलांमध्ये वाढली लठ्ठपणाची समस्या!

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभर बंदची परिस्थिती उद्भवली होती. यामुळे दळणवळण, सर्व कार्यालये, महाविद्यालये व शाळा बंद होते. परिणामी, नागरिकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. यामध्ये सर्वांत जास्त परिणाम लहान मुलांवर झाला. इतर वेळी लहान मुले शाळेत जाण्यासाठी, मित्रांबरोबर खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, लॉकडाऊनमध्ये हे सर्व बंद झाल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे.

घरबसल्या ऑनलाइन शिक्षण, व्हिडिओ गेम, टीव्ही, मोबाइल यांचा अतिरेक झाल्यामुळे लहान मुलांच्या शरीराची कसरत थांबली आहे. परिणामी, लहान मुले लठ्ठ अर्थात मोटू बनत चालली आहेत. यामुळे विविध आजारांनादेखील निमंत्रण मिळत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लहान मुले सुदृढ असणे गरजेचे आहे. लठ्ठपणाच्या समस्येमुळे पालकांची चिंता वाढत चालली आहे.

वजन वाढले कारण की...

लहान मुलांना कोरोनाकाळात घराबाहेर पडण्यास मनाई केल्यामुळे त्यांचे मैदानी खेळ खेळणे बंद झाले, तसेच शाळा बंद असल्याने शाळेत खेळाच्या तासाला खेळण्यात येणारे खो-खो, लंगडी, कबड्डी यासारखे खेळदेखील बंद झाले. काही ठिकाणी शाळांमध्ये दरवर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने हे खेळदेखील बंद आहेत. याउलट मुले आता मोबाइल व टीव्ही यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत असल्याने त्यांचे वजन वाढत चालले आहे.

ही घ्या काळजी!

मुलांनी घराबाहेर न जाता केवळ घरात राहूनदेखील त्यांना चांगल्या प्रकारे व्यायाम करता येऊ शकतो. यासाठी घरातच उड्या मारणे, सूर्यनमस्कार करणे, योगासने, प्राणायाम, तसेच एखादी पंचिंग बॅग असल्यास तिला दररोज जोरजोरात हातापायांनी मारणे किंवा इमारतीत राहत असल्यास इमारतीच्या पायऱ्या चढ-उतार करणे यासारख्या प्रकारांमुळे शरीराची चांगल्या प्रकारे कसरत होऊ शकते. कोणतीही कसरत करत असताना मुलांना भरपूर घाम येणे महत्त्वाचे असते. यामुळे लठ्ठपणावर मात करण्यास मदत होऊ शकते.

पालकांनी लहान मुलांपासून मोबाइल दूर ठेवणे गरजेचे आहे. मोबाइल गेमच्या आहारी गेल्यामुळे मुले दिवसभर मोबाइलमध्येच गुंतलेली असतात. यामुळे त्यांना मैदानी खेळांचा विसर पडत चालला आहे. कोरोनासंबंधित सर्व काळजी घेत मैदानी खेळ खेळले आणि व्यायाम केल्यास लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

-डॉ. दिनकर पांचाळ

मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत

कोरोनामुळे लहान मुले घराबाहेर पडू शकत नाहीत. शाळेचा अभ्यासही ऑनलाइन झाला आहे. त्याचप्रमाणे मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठीदेखील ते ऑनलाइन पर्यायच निवडत आहेत. परिणामी, खेळ खेळणेदेखील बंद झाले आहे. यामुळे घरबसल्या ते मोबाइल व टीव्ही यातच गुंतलेले असतात. कधी- कधी पालकांचे बोलणेदेखील मुले ऐकत नाहीत. ही एक गंभीर समस्या आहे.

-उर्मिला घाग, पालक

Web Title: Corona causes obesity problem in young children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.