मुंबई : एस. टी. महामंडळातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य जाहीर केले होते. महामंडळातील साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत एकूण २४५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, या परिपत्रकाच्या अनुषंगाने केवळ ११ कर्मचारीच हे सानुग्रह सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.
या परिपत्रकात प्रवाशांची प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, बसस्थानकावर काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी मृत कर्मचारी हे सहाय्य मिळण्यास पात्र ठरले नाहीत.
खरंतर चालक-वाहक ज्यावेळी कामगिरीवरुन आगारात येतात, त्यावेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो. तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांशी येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक-वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी यांचा हस्ते परहस्ते संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय व एस. टी. महामंडळाची इतर सर्व कार्यालये याठिकाणीही कामगिरीवर येणारे कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी हे बस, रेल्वे व इतर वाहनांतून कामगिरीवर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांशी संपर्क येतो व त्यामुळेही बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.
कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ मदत मिळावी
परिवहन मंत्री अनिल परब यांना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी पत्र लिहिले असून, कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी त्यात केली आहे. तसेच त्यांनी एस. टी. महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटींवरदेखील बोट ठेवले आहे. या परिपत्रकात प्रवाशांशी प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी मृत कर्मचारी हे सहाय्य मिळण्यास पात्र ठरले नाहीत. या परिपत्रकात बदल करावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
वारसांना नोकरीची प्रतीक्षा
एकीकडे बहुतांशी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला नसताना, त्यांच्या वारसांनाही अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. अगोदरच अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी राज्यातील अनेक विभागात भली मोठी प्रतीक्षा यादी असून, सध्या जे कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले, त्यांच्या वारसांना अशा परिस्थितीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नव्याने नोकरी मागणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियम, अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तत्काळ पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आता एस. टी. संघटना करू लागल्या आहेत.