मुंबई : सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत का होईना, सुरू झालेल्या लोकलने मुंबई महापालिकेच्या चिंतेत पुन्हा भर घातली आहे. कारण मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वर जात असून, पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूरसह लगतच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या परिसरात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे; अशा ठिकाणी साहजिकच सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसविण्यात येतात. परिणामी, काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आरोग्याच्या दृष्टीने येथे सर्वाधिक खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
नदीची स्वच्छता नावापुरतीच पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, विद्याविहार, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, पवई, साकीनाका, कांजूरमार्गसारख्या परिसरांचा समावेश आहे. कुर्ला, गोवंडी, देवनार, मानखुर्दसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चाळी, झोपड्या तसेच इमारतीही आहेत. मात्र, इमारतींचे प्रमाण कमी आहे. भांडुप, साकीनाका, पवई येथे मोठ्या प्रमाणावर चाळी असून, काही परिसरात झोपड्या आहेत. मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती असून, कुर्ला परिसरात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. कुर्ला परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून, येथील वस्त्या मोठ्या प्रमाणावर गलिच्छ आहेत. मोठे तसेच छाेट्या नाल्यांसह येथून वाहणाऱ्या नदीची स्वच्छता केवळ नावापुरतीच हाेत असल्याचे पाहायला मिळते.
रुग्णवाढीचा धोका अस्वच्छतेमुळे अधिकएल वॉर्डमध्ये कुर्ला येथील कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम परिसर, कमानी, साकीनाका, बैलबाजार, ख्रिश्चन गाव, क्रांतिनगर, संदेशनगर, हलाव पूल, न्यू मिल रोड, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील परिसर अशा अनेक परिसरांचा समावेश आहे. येथील परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि चाळी असून, परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. बहुतांश चाळी, झोपड्या, इमारती मिठी नदीलगत आहेत. येथील अस्वच्छतेमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याने एल वॉर्डकडे प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
कुर्ल्यात सुरक्षा हवी- कुर्ला परिसरात जंतुनाशक फवारणी आवश्यकतेनुसार करण्याची गरज आहे. कधी काळी साफ असणारी मिठी नदी साफ करण्याची गरज आहे. - छोटे आणि मोठे नाले स्वच्छ राहतील, हे पाहणे गरजेचे आहे. हे केवळ मुंबई पालिकेचे काम नाही, तर नागरिकांनीही स्वच्छता राखली पाहिजे. - काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे, तरच संसर्ग पसरणार नाही, असे कुर्ला, बैल बाजारमधील शारदा मंदिर परिसरात राहणारे राकेश पाटील यांनी सांगितले.