दादरमधील घटना; वेळीच मदत मिळाल्याने वाचले महिलेचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित महिलेची प्रकृती अचानक खालावली. श्वास घेता येईना, चालताही येईना. शेजाऱ्यांकडून मदत मिळण्याची अपेक्षा नसल्याने मृत्यू दारासमोर दिसत होता; पण ‘तो’ एक फोन तिला मरणाच्या दाढेतून ओढून घेऊन नवजीवन देऊन गेला.
शिवाजी पार्कच्या एम. बी. राऊत मार्गावरील देसाई कॉटेज इमारतीत राहणाऱ्या सुप्रिया जुन्नरकर (४२) यांच्यावर कोरोनामुळे बिकट प्रसंग ओढावला. कोरोनाची लागण झाल्याने आईला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बेड न मिळाल्याने त्या स्वतः आणि वडील घरीच विलगीकरणात राहिले; परंतु पुरेसे उपचार न मिळाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. या धक्क्याने सुप्रिया यांची तब्येत खालावली. ऑक्सिजनची पातळी कमी-कमी होत गेल्याने श्वास घेता येईना, रुग्णालयात जाण्यासाठी अंगात त्राण नव्हते. वॉर रूममधील फोन व्यस्त, भाऊ युरोपात असल्याने त्याच्याशी संपर्क होईना. त्यामुळे मृत्यू अटळ असल्याची जाणीव त्यांना झाली; पण त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून टेलिफोन डायरी चाळली आणि एका नंबरवर फोन लावला.
शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा तो नंबर होता. रावते यांनी सारी हकीकत ऐकून घेऊन विशाखा राऊत यांच्या कानावर हा प्रकार घातला. राऊत यांनी दादरचे शाखाप्रमुख यशवंत विचले यांच्याशी संपर्क साधला. विचले यांनी तातडीने जुन्नरकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्यासोबत विजय नंदिवडेकर, अक्षय शिंगरे हे सहकारी होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली.
दहा मिनिटांत जुन्नरकर यांच्या घराबाहेर रुग्णवाहिका दाखल झाली. तोपर्यंत रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या महिलेचे नशीब इतके बलवत्तर की तिला नायर रुग्णालयात तिच्या आईच्या शेजारी बेड उपलब्ध झाला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले.
* कोरोनाविरोधातील लढ्याला बळ...
‘आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा या महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. जवळपास धीर देणारे कोणी नसल्यामुळे ती पुरती खचली होती. शेजाऱ्यांनी तिची विचारपूसही केली नाही; पण पालिकेचे अधिकारी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तिला जीवनदान मिळाले. कोरोनाची लागण होण्याची भीती असतानाही आम्ही माणुसकीच्या भावनेतून तिला मदत केली. आता तिची प्रकृती स्थिर आहे. या महिलेचा जीव वाचल्यामुळे कोरोनाकाळातील मदतकार्य आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली’, अशी प्रतिक्रिया दादरचे शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी ‘लोकमत’ला दिली.
..................................................