Join us

कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये कोरोनावर नियंत्रंण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:03 PM

कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील परिमंडळ 7 च्या कांदिवली, बोरिवली व दहिसर या भागात कोरोनावर पालिकेने नियंत्रंण मिळवले.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील परिमंडळ 7 च्या कांदिवली, बोरिवली व दहिसर या भागात कोरोनावर पालिकेने नियंत्रंण मिळवले असून येथे कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे येथील गणपत पाटील नगर,दामू नगर,देवी पाडा, काजू पाडा, केतकी पाडा, बंदर पखाडी,वडार पाडा, लालजी पाडा, पोयसर या सारख्या झोपडपट्टी भागात पालिकेने कोरोनवर नियंत्रण मिळवले आहे.या परिमंडळात दि,11 जुलै रोजी स्लम मधील कंटेन्मेंट झोन मधील 122 पैकी 49 स्लम कोरोना मुक्त झाल्या असून इमारतीमधील 3873 कंटेन्मेंट झोनपैकी 2305 इमारती या कोरोनामुक्त झाल्या आहेत.

परिमंडळ 7 मध्ये एकूण 51 कंटेनमेंट झोन पैकी 18 झोन मध्ये गेल्या 14 दिवसात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची झिरो मिशन आणि चेस द व्हायरस या मोहिम या भागात पालिका प्रशासन रोज प्रभावीपणे राबवत आहे.या परिमंडळात कोरोना रुग्ण शोध मोहिम युद्धपातळीवर राबवण्यात येत असून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी,फिव्हर कॅम्पचे आयोजन,मोबाईल व्हॅन टेस्टिंग,स्वॅप टेस्टिंग, सॅरो आणि अँटीजन टेस्टिंग यामुळे येथे कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे  चित्र आहे. तसेच आपले तिन्ही सहाय्यक आयुक्त,अधिकारी व कर्मचारी यांची अविरत मेहनत,खासदार ,आमदार,नगरसेवकांचे मिळत असलेले चांगले सहकार्य यामुळे उत्तर मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश मिळत असल्याची माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला माहिती दिली.

आर दक्षिण वॉर्ड मध्ये दि,11 जुलै पर्यंत स्लम मध्ये 1397( 41%) कोरोना रुग्ण, आणि इमारतींमध्ये 2015(59%) तर आर मध्य येथील स्लम मध्ये  681 ( 19.82%),तर इमारतींमध्ये 80.18 %),तर आर उत्तर मध्ये  स्लम मध्ये 905(44.80%),तर इमारतींमध्ये 1115(55.20%) इतके कोरोना रुग्ण आढळून आले.विशेष म्हणजे स्लम पेक्षा इमारतींमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. दि,26 जून ते 8 जुलै या काळात कांदिवलीच्या आर दक्षिण वॉर्डमध्ये कोरोनाचे 874, बोरिवलीच्या आर मध्य वॉर्ड मध्ये 915 व  दहिसरच्या आर उत्तर वॉर्ड मध्ये 452 असे नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान मास्क घातला नसलेल्या नागरिकांकडून 1 जून ते 10 जुलै पर्यंत प्रत्येकी 1000 रुपये दंड याप्रमाणे आर दक्षिण वॉर्ड मध्ये 1,79000, आर मध्य वॉर्ड मध्ये 24000 तर आर उत्तर वॉर्ड मध्ये 82000 असा एकूण 2,85000 दंड पालिका प्रशासनाने वसूल केला असल्याची माहिती विश्वास शंकरवार यांनी दिली.

आर दक्षिण वॉर्ड मध्ये दि,11 जुलैच्या रिपोर्ट प्रमाणे या दिवशी कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळून आले असून आता पर्यंत एकूण 3412 कोरोना रुग्णांपैकी 1940 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आतापर्यंत 158 रुग्णांचे निधन झाले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1314 इतकी आहे.आर मध्य वॉर्ड मध्ये दि,11 जुलै रोजी 92 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले,एकूण 3430 कोरोना रुग्णां पैकी1620 रुग्ण कोरोना मुक्त झाले,तर 113 रुग्णांचा आज पर्यंत मृत्यू झाला.त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1697 इतकी आहे.आर उत्तर वॉर्ड मध्ये दि,11 जुलै रोजी 49 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले,एकूण 2020 पैकी 1191 रुग्ण कोरोना मुक्त झाले.तर 158 नागरिकांचा मृत्यू झाला. दि,11 जुलै पर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 671 इतकी आहे. 

परिमंडळ 7 चा विचार करता या ठिकाणी एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 8862 इतकी होती,त्यापैकी 4751 रुग्ण कोरोना मुक्त झाले, दरम्यान 429 नागरिकांचा मृत्यू झाला,तर दि,11 जुलै पर्यंत याठिकाणी कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 3682 इतकी असून हे प्रमाण 41.55 टक्के इतके आहे अशी विस्तृत आकडेवारी उपायुक्त शंकरवार यांनी शेवटी दिली.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई